News18 Lokmat

BREAKING : निवडणूक आयोगाने VVPAT संदर्भातली विरोधकांची मागणी फेटाळली

विरोधकांची VVPAT संदर्भातली मागणी पूर्ण केली तर संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यासाठी कदाचित दोन ते तीन दिवसही लागू शकतात, असं सांगितलं जात होतं.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 03:17 PM IST

BREAKING : निवडणूक आयोगाने VVPAT संदर्भातली विरोधकांची मागणी फेटाळली

नवी दिल्ली, 22 मे : यंदा कल समोर येण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. विरोधकांची VVPAT संदर्भातली मागणी पूर्ण केली तर संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यासाठी कदाचित दोन ते तीन दिवसही लागू शकतात, असं सांगितलं जात होतं. पण निवडणूक आयोगाने विरोधकांची मागणी फेटाळली आहे. EVM मशीनची मतमोजणीच आधी सुरू केली जाईल आणि नंतर VVPAT च्या मतपावत्यांची मोजणी करून त्याचे आकडे EVM च्या आकड्यांशी पडताळले जातील, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

आधी VVPAT च्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी असल्याने त्याची पडताळणी संपेपर्यंत निकाल जाहीर करता येणार नाही आणि त्यास विलंब होईल, असं आयोगाच्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.

विरोधी पक्षांच्या 21 नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे VVPAT मशीमधल्या मतपावत्या प्रथम मोजण्याची मागणी केली होती. त्यावर निवडणूक आयोगानं निर्णय घेतला आहे. त्यासाठी बैठक काही वेळापूर्वी संपली. त्यानंतर आयोगाने मतमोजणीत कुठलाही बदल केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

काय आहे प्रक्रिया?

लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभेतल्या 5 मतदान केंद्रातल्या VVPAT मशीनमधील मतपावत्यांची मोजणी प्रथम करावी. ती EVM मशीनबरोबर पडताळून पाहावी. या दोन आकड्यांत काही फरक दिसला तर सर्व VVPAT च्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. असं झालं  असतं तर प्रत्यक्ष मतदानयंत्रांची EVM मतमोजणी सुरू व्हायला दुपार उजाडेल.

Loading...

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार एका फेरीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या फेरीला सुरुवात होते.

एका लोकसभा मतदारसंघात किमान 5 विधानसभा क्षेत्रांचा समावेश असतो. त्यामुळे मतमोजणीची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रांतले आकडे एकत्र करून मग लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीचे निकाल जाहीर करण्यात येतात. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. याच पद्धतीने मतगणना करावी असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या प्रशासनाला दिले आहेत.

याशिवाय जर VVPAT मतपावत्यांची गणना सुरू केली, तर दुपारपर्यंत तीच सुरू राहील आणि प्रत्यक्ष मतमोजणी त्यानंतर सुरू केली जाईल. निवडणूक आयोगाने VVPAT मतपावत्यांच्या मोजणीविषयी अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नव्हते. EVM मशीनची मोजणी पूर्ण झाल्यानंतर फक्त खातरजमा करण्यासाठी कोणत्याही 5 मतदान केंद्रातल्या मतपावत्यांची मोजणी करण्यात येणार होती. असं झालं तर मतमोजणी प्रक्रिया तुलनेनं लवकर संपू शकते.

दिल्लीचे निवडणूक आयुक्त रणबीर सिंह यांनी बुधवारी सांगितलं करी, EVM मशीनच्या मतजोणीला 8-10 तास लागतात. त्यानंतर VVPAT मतपावत्यांची गणना सुरू केली तर त्यासाठी पुढचे 5-6 तास लागू शकतील. पूर्ण निकाल हाती यायला या हिशोबाने गुरुवारी रात्री 10- 12 वाजू शकतात. पण विरोधी पक्ष म्हणतात, तशी प्रक्रिया उलटी केली, तर यापेक्षा जास्त वेळ लागेल.

विरोधी पक्षांनी खरं तर सुरुवातीपासून 50 टक्के VVPAT मशीनमधल्या मतपावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी केली होती. तसं झालं तर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या 125 मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात येईल. ही मागणी मान्य केली असती, तर निकालाला 6 दिवस उशीर होईल, असं आयोगाने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टानेसुद्धा सर्व VVPAT मशीनच्या पडताळणीची गरज नसल्याचा निर्वाळा दिला होता. तरीही विरोधकांचं समाधान झालेलं नव्हतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2019 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...