लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : अवघ्या जगाला उत्तर देणारा नरेंद्र मोदींचा प्रचंड विजय

नरेंद्र मोदी... टाइम मासिकाने ज्यांचा उल्लेख डिव्हायडर इन चीफ' असा केला त्या मोदींसाठी आजचा निकालाचा दिवस अनेक चांगल्या बातम्या घेऊन आला. मोदींचा दणदणीत विजय हा भारताकडे ठराविक दृष्टीने पाहणाऱ्यांना दिलेलं सणसणीत उत्तर आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 06:15 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : अवघ्या जगाला उत्तर देणारा नरेंद्र मोदींचा प्रचंड विजय

नवी दिल्ली,23 मे : नरेंद्र मोदी... टाइम मासिकाने ज्यांचा उल्लेख डिव्हायडर इन चीफ' असा केला त्या मोदींसाठी निकालाचा दिवस अनेक चांगल्या बातम्या घेऊन आला. मोदींचा दणदणीत विजय हा भारताकडे काही ठराविक दृष्टीने पाहणाऱ्यांना दिलेलं सणसणीत उत्तर आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात जाती, धर्म, लिंगभेद, लोकसंख्येची रचना याबरोबरच भौगोलिक मर्यादा हे सगळंच पार करणारं हे यश आहे. मोदींचा प्रचंड विजय फक्त एकाच पद्धतीने तोलता येईल. निकालाचे ट्रेन्ड पाहिले तर आता भाजपला 48 टक्के मतं मिळाली, अशी आकडेवारी समोर येते. याचा अर्थ दोन नागरिकांमधल्या एकाने मोदींना मत दिलं आहे.

करिश्मा आणि कठोर मेहनत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेली कामगिरी, त्यांचा वैयक्तिक करिश्मा आणि कठोर मेहनत या जोरावर भाजप आणि एनडीए ने गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा सरस असं यश मिळवलं.

2014 च्या निवडणुकीत एनडीएला 332 जागा मिळाल्या होत्या. त्याहीपेक्षा भाजप आणि एनडीएने मुसंडी मारली आहे.

Loading...

काँग्रेसने मोदी सरकारविरोधात उच्चरवात केलेल्या आरोप - प्रत्यारोपांची मोहीम सोडली तर काँग्रेसचा या निवडणुकीत काहीच प्रभाव पडला नाही. आताच्या निकालांचा कल पाहिला तर काँग्रेस सर्वात मोठ्या विरोधी पक्षाची जागा गमावेल, असं चित्र आहे. केरळ आणि पंजाब ही दोन राज्यं सोडली तर कुठेही काँग्रेस चांगली कामगिरी करू शकली नाही.

उत्तर प्रदेशमध्येही यश

उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाने भाजपसमोर आव्हान निर्माण केलं होतं पण तरीही उत्तर प्रदेशमध्ये जे नुकसान झालं ते भाजपने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये भरून काढलं. पश्चिम बंगालमध्ये तर ममता बॅनर्जींना मोठं आव्हान निर्माण करत भाजपने त्यांच्या जागा खेचून आणल्या.

भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी बांधू पाहणाऱ्या चंद्राबाबू नायडूंनाही त्यांच्या राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हार पत्करावी लागली. तिथे जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचा विजय झाला.

उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या हिंदीभाषक राज्यांमध्येही भाजपला चांगलं यश मिळालं. सपा-बसपा गठबंधनच्या दलित-मुस्लीम व्होटबँकेच्या बाहेरची मतं मिळवण्यात भाजप यशस्वी ठरलं.

बिहारमध्ये युती फायद्याची

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेले धडे भाजपने लक्षात ठेवले आणि लोकसभेमध्ये विजयाची वेगळी समीकरणं तयार केली. तिथे नितिशकुमार यांच्या जेडीयूशी केलेली युती भाजपच्या फायद्याची ठरली. झारखंडमध्येही भाजपने झारखंड स्टुडन्ट युनियनची मदत घेतली. त्यामुळे उच्चवर्णीय आणि ओबीसींची मतं भाजपला मिळाली.

भाजपने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मिळवलेला हा विजय हा मोदी- शहांच्या स्मार्ट प्लॅनिंगचा परिणाम आहे. उमेदवारांची निवड करण्यापासून ते विरोधी पक्षांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्यापर्यंतची रणनीती या दोघांनी आखली.

नवे चेहरे वि. घराणेशाही

साध्वी प्रज्ञासिंह, तेजस्वी सूर्या, गौतम गंभीर, सूफी गायक राज हंस, भोजपुरी अभिनेता रवि किशन असे नवे चेहरेही भाजपने अत्यंत नियोजनबद्द पद्धतीने रिंगणात उतरवले. याउलट विरोधी पक्ष मात्र आपापल्या घराण्यांनाच चिकटून राहिलेले दिसले. कर्नाटकमधून देवेगौडा, महाराष्ट्रात पवार, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, उत्तर प्रदेशमध्ये अजित सिंग, आसाममध्ये गोगोई आणि हरियाणामध्ये चौटाला अशी सगळी घराणी आपापले उमेदवार उतरवताना दिसली.

जगभरातून अभिनंदन

मोदींच्या या विजयाबद्दल जगभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच अनेक बड्या नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन न्येतानाहू यांनी तर हिंदीमधून ट्वीट करून मोदींचं अभिनंदन केलं.

'भारत पुन्हा जिंकला'

या विजयाचे शिल्पकार नरेंद्र मोदींनी अजून त्यांची प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्विटरवरच्या काही संदेशांमधून मात्र मोदींचा आवाज ऐकू आला. भारत पुन्हा जिंकला आहे, असं ट्वीट त्यांनी केलं. त्यासोबतच जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांनी आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा जिंकल्याबद्दल त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

=================================================================================

VIDEO : भाग भाग..शेर आया शेर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...