लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजधानीत भाजपला मोठं यश, शीला दीक्षित पिछाडीवर

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजधानीत भाजपला मोठं यश, शीला दीक्षित पिछाडीवर

राजधानी दिल्लीत भाजपने मागच्या निवडणुकीप्रमाणेच बाजी मारली आहे. इथे लोकसभेच्या सातही जागांवर भाजप विजयी होताना दिसते आहे. 2014 च्या निवडणुकीतही या सातही जागा भाजपला मिळाल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली 23 मे : राजधानी दिल्लीत भाजपने मागच्या निवडणुकीप्रमाणेच बाजी मारली आहे. इथे लोकसभेच्या सातही जागांवर भाजप विजयी होताना दिसते आहे. 2014 च्या निवडणुकीतही या सातही जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. त्यानंतर भाजप आणि ‘आप’मध्ये जोरदार संघर्ष झाला. काँग्रेसलाही इथे आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडावं लागलं. काँग्रेस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित पिछाडीवर आहेत.

आघाडी न केल्यामुळे नुकसान

पाच वर्षानंतरही नरेंद्र मोदींचा प्रभाव कायम असल्याने आपने मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दाखवली होती. ज्या काँग्रेसला दूषणं देत त्यांनी आपला पक्ष काढला आणि राजकारणात नवी क्रांती करत असल्याची घोषणा केली, त्याच आपला पाच वर्षानंतर काँग्रेस सोबत आघाडी करण्यासाठी जाहीर आवाहन करावं लागलं होतं. मात्र जागांवरून गणित बिनसल्याने काँग्रेसने आघाडी करण्यास नकार दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आपला करिष्मा सिद्ध करण्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. आपमध्येही बरीच फाटाफूट झाल्याने त्याचा फटका पक्षाला बसला.

गौतम गंभीरच्या लढतीकडे लक्ष

यावेळी सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते पूर्व दिल्लीतल्या लढतीकडे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भाजपने तिकीट दिल्यानं ही लढत जास्त चुरशीची झाली. तर आपने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित अतिशी मार्लेना यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने अरविंदसिंह लव्हली यांना मैदानात उतरवलं होतं. अतिशी यांच्याविषयी छापलेल्या वादग्रस्त पत्रकामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. हे पत्रक गौतम गंभीर यांनीच छापल्याचा आरोप आपने केला. तर आरोप सिद्ध झाला तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन असं आव्हान गौतम गंभीर यांनी दिलं होतं.

उत्तर पूर्व दिल्लीत शीला दीक्षित विरुद्ध मनोज तिवारी

उत्तर पूर्व दिल्लीत भाजप आणि काँग्रेसने आपल्या प्रदेशाध्यक्षांना मैदानात उतरवलं. शीला दीक्षित या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर मनोज तिवारी यांना भाजपने उमेदवारी दिली होती. तर दिलीप पांडे आपचे उमेदवार होते. दिल्ली विधानसभेच्या पराभवानंतर शीला दीक्षित सक्रिय राजकारणातून काहीशा बाहेर पडल्या होत्या. मात्र काँग्रेसने त्यांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा डाव खेळला. सलग १० वर्ष त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळल्याने लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे त्याचाच फायदा घेण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. पण यात काँग्रेसला यश मिळत नाही, असं दिसतंय.

==============================================================================

VIDEO : सेनेच्या वाघाने पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची रोखली वाट, अजितदादांना दिलं हे चॅलेंज

First published: May 23, 2019, 2:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading