S M L

काँग्रेसच्या 3 नेत्यांनी सांगितलं पक्षाच्या मानहानीकारक पराभवाचं खरं कारण

पराभवाची जबाबदारी घेत पक्ष पातळीवर अनेक नेते राजीनामे देत असून राहुल गांधी यांच्या ऑफिसमध्ये काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 10:14 AM IST

काँग्रेसच्या 3 नेत्यांनी सांगितलं पक्षाच्या मानहानीकारक पराभवाचं खरं कारण

मुंबई, 25 मे :  लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार हादरा बसला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाच त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ अमेठी इथं पराभव झाला. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला शुन्यावर बाद व्हावं लागलं. या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

'आमच्या पक्षाने केलेला नकारात्मक प्रचार हे आमच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल घोटाळ्याचा आरोप करत आम्ही आक्रमक भूमिका घेतली. चौकीदार चोर है, या मागच्या घोषणेला चांगला प्रतिसादही मिळाला. पण तीच घोषणा आमच्यासाठी नुकसान करणारी ठरली,' असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. याबाबत 'इंडियन एक्स्प्रेस'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, पराभवाची जबाबदारी घेत पक्ष पातळीवर अनेक नेते राजीनामे देत असून राहुल गांधी यांच्या ऑफिसमध्ये काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे. 2014 च्या पराभवानंतर काँग्रेस सावरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी आपल्या स्वभावात बदल करत आक्रमक रुप धारण केलं होतं. त्यामुळे काँग्रेस भाजपला कडवी झुंझ देईल असं चित्र निर्माण झालं होतं.


राफेलच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि चौकिदार चोर है ही घोषणा गाजल्याने त्याचा फटका भाजपला बसेल असंही बोललं जात होतं. मात्र या कुठल्याही मुद्याचा परिणाम झाला नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. महाराष्ट्रात तर अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते पराभूत झाले. त्यामुळे विविध पदांवर असलेल्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे राजीनामे पाठवायला सुरुवात केलीय.

विविध राज्यांचे पक्षाध्यक्ष, प्रचार प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपले राजीनामे राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडे पाठवले आहेत. तर पक्षाची जबाबदारी घेत खुद्द राहुल गांधी हेच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असंही बोललं जातंय. पराभवाच्या कारणांची चर्चा करण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसची बैठक होणार असून ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.


Loading...

VIDEO : चंद्रकांत खैरेंच्या पराभवावर दानवेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 09:56 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close