उगाच गोंधळ वाढवू नका, काँग्रेसच्या ७ जागांच्या प्रस्तावावर मायावतींची टीका

उगाच गोंधळ वाढवू नका, काँग्रेसच्या ७ जागांच्या प्रस्तावावर मायावतींची टीका

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींना काँग्रेसने ७ जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याने त्या संतापल्या आणि त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेशात आणि राज्याबाहेरही बसपाची काँग्रेसशी युती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

लखनौ, १८ मार्च : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींना काँग्रेसने ७ जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याने त्या संतापल्या आणि त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेशात आणि राज्याबाहेरही बसपाची काँग्रेसशी युती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी रविवारी लखनौमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय सपा बसपाने घेतला आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष सपा-बसपा- रालोद च्या महागठबंधनसाठी ७ जागा सोडेल, असं ते म्हणाले होते.

त्यावर, काँग्रेसने राज्यातल्या ८० जागांवर उमेदवार उभे केले तरी चालेल. सपा आणि बसपा आघाडी भाजपचा पराभव करायला समर्थ आहे, अशा शब्दांत मायवातींनी काँग्रेसला उत्तर दिलंय.

बहुजन समाज पक्षाप्रमाणेच समाजवादी पार्टीचीही भाजपशी कोणत्याच प्रकारची युती नाही. त्यामुळे सपा - बसपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या प्रस्तावाकडे लक्ष देऊ नये, असंही त्या म्हणाल्या.

सपा, बसपा आणि राष्ट्रीय लोकदलाच्या नेत्यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार उभे करणार नाही, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती. त्याला मायावतींनी आता खणखणीत उत्तर दिलं आहे.

अमेठीमध्ये राहुल गांधी आणि रायबरेलीमध्ये सोनिया गांधींच्या विरोधात उमेदवार उभे करायचे नाही, असा निर्णय सपा- बसपा या पक्षांनी एकत्रितरित्या घेतला आहे. पण सात जागांमध्ये काँग्रेसशी काहीच बोलणं झालेलं नाही. त्यामुळे काँग्रेस गोंधळ वाढवतं आहे, अशी टीका मायावतींनी केली.

उत्तर प्रदेशात सपा-बसपा-रालोद अशी आघाडी असल्यामुळे आधी भाजप विरुद्ध हे महागठबंधन अशी लढत होणार होती पण काही ठिकाणी या लढती तिरंगीही होणार आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेस दलित आणि ओबीसी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतंय.त्यामुळेच मायावती आणि काँग्रेसमधला संघर्ष वाढला आहे.

========================================================================================================================================================

First published: March 18, 2019, 4:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading