उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी सपा-बसपाला टक्कर देणार का ?

उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी सपा-बसपाला टक्कर देणार का ?

ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रियांका गांधी यांना राजकारणात आणून राहुल गांधींनी मोठा राजकीय डाव खेळला आहे. प्रियांकांच्या एन्ट्रीनंतर उत्तर प्रदेशात बरीच राजकीय उलथापालथ झालीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मार्च : प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सगळेजण एकच प्रश्न विचारतायत. प्रियांका गांधी काँग्रेसला जिंकून देतील का ?

त्यांच्या येण्यामुळे मायावतींचं नुकसान होऊ शकतं का ?

दलित मतं मिळवण्यासाठी प्रियांका गांधी काँग्रेसचं ट्रम्प कार्ड होणार का ?

भाजप आणि सपा - बसपाचा खेळ पालटण्यात प्रियांका किती यश मिळवतील ?

ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रियांका गांधी यांना राजकारणात आणून राहुल गांधींनी मोठा राजकीय डाव खेळला आहे. प्रियांकांच्या एन्ट्रीनंतर उत्तर प्रदेशात बरीच राजकीय उलथापालथ झालीय. आतापर्यंत भाजप विरुद्ध सपा-बसपा गठबंधन अशी थेट लढत होणार, असं मानलं जात होतं. पण आता प्रियांकांमुळे ही लढत तिरंगी झाली आहे.

पाटीदार आणि रावण यांच्याशी युती

यावर नीट लक्ष दिलं तर त्यांच्या एंट्रीचा भाजप आणि सपा-बसपा गठबंधनला थेट फायदा मिळू शकतो. यूपीमध्ये काँग्रेसने दलित आणि ओबीसी मतांवर जास्त भर दिला आहे. याआधी ही बसपाची व्होटबँक होती. गुजरातमध्येही काँग्रेसने पाटीदार नेता हार्दिक पटेल यांना आपल्या तंबूत आणलं. त्यानंतर चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना खुला पाठिंबा देऊन राजकीय धुरळा उडवून दिला.

काँग्रेसच्या सरचिचणीस बनल्यानंतर प्रियांका गांधी 'सॉफ्ट हिंदुत्व' च्या मार्गावर चालताना दिसतायत. त्यांनी गंगाकिनारी राहणाऱ्या लोकांच्या भेटीगाठींचे दौरे आखले आहेत. 18 ते 20 मार्च या काळात त्या अलाहाबाद ते वाराणसीपर्यंत गंगेतून बोटयात्रा काढणार आहेत. प्रयागराज आणि वाराणसीमध्ये त्या लोकांना भेटतील. या यात्रेसाठी त्यांनी निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे.

वस्तुस्थिती पाहता, गैरयादव असलेल्या मागासलेल्या समुदायांमध्ये आपली जागा बनवण्यासाठी ही यात्रा आहे. जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि नव्या अर्थव्यवस्थेमध्ये स्वत:ची जागा बनवण्यासाठी धडपडत आहेत त्यांना काँग्रेस आपल्याकडे वळवू पाहतंय.

समीकरणं बिघडली

काँग्रेसच्या या बदललेल्या रणनीतीमुळे मायवती आणि अखिलेश यांच्यापुढची चिंता वाढली आहे. त्यांनी भाजपलाही हैराण केलं आहे. समाजवादी पक्षाच्याच एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, 'काँग्रेसच्या या प्रियांका अस्त्राने आमची राजकीय समीकरणं बिघडून टाकली आहेत. याआधी काँग्रेस फक्त भाजपची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत होतं पण आता काँग्रेसने सपा बसापलाही आव्हान दिलंय.

काँग्रेस जर दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदारांना गाठू शकली तर काँग्रेसला थोडीसी मदत होऊ शकते. मागच्या 2 निवडणुकांमध्ये याच वर्गात काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.

मागच्या निवडणुकीत 2 जागा

दुसरीकडे, सपा- बसपा गठबंधनच्या सूत्रांनी सांगितलं की काँग्रेस मायवातींची व्होटबँक आपल्याकडे घेऊ शकत नाही. यामध्ये दलित आणि इतर मागासवर्गीयही आहेत. या गठबंधनमध्ये मुस्लीम व्होटबँकही आहे. ते अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला पाठिंबा देतात.

2009 मध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशात 21 जागा जिंकल्या होत्या पण 2014 मध्ये काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या. सोनिया गांधी यांची रायबरेली आणि राहुल गांधी यांची अमेठी एवढ्या दोनच जागा काँग्रेस वाचवू शकली. काँग्रेसच्या मतांची टक्केवारीही चांगलीच खाली आली.

2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अखिलेश यादव यांच्याशी काँग्रेसने युती केली होती. त्यामुळे त्यांना अमेठी आणि रायबरेली क्षेत्रातल्या 10 पैकी 4 विधानसभा जागांमध्ये विजय मिळाला होता.

-----------------------------------------------------------------------------


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या