नवी दिल्ली 19 मे : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. लोकसभेच्या निवडणुकांचा निकाला लागण्याआधीच विरोधकांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. आम्ही परिस्थितीचं विश्लेषण करत असून 23 तारखेनंतरच पुढचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केलीय. पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक पक्षांची चिंता वाढली आहे.
लोकसभेची निवडणूक सुरू होण्याआधी भाजप विरोधात महाआघाडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र निकालाआधी एकत्र आल्यास सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी बळकटी मिळेल असा चंद्राबाबू नायडूंचा अंदाज आहे. मात्र शरद पवारांच्या प्रतिक्रियेवरून निकाल आल्याशीवाय पवार भूमिका स्पष्ट करणार नाहीत हे दिसून येतंय.
पवार म्हणाले, आजची बैठक ही औपचारिक बैठक होती. बैठकीमध्ये निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आलं. निकालापूर्वी पूर्वी पुन्हा एकदा आम्ही बसणार आहोत. आम्ही कुठे कुठे जिंकू शकतो यावर बैठकीत विश्लेषण केलं आहे. 23 तारखेची वाट पाहायची आहे आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.
पवारांच्या या भूमिकेमुळे विरोधी पक्ष आणि काँग्रेसची चिंता वाढणार आहे. पवार कुठली खेळी खेळतील याचा अंदाज अजुन येत नाही असंही बोललं जातंय. राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारण्याची पवारांची तयारी नाही असे संकेत त्यांनी अनेकदा दिले आहेत.
महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळाल्या आणि केंद्रात कुणालाच बहुमत मिळालं नाही तर पंतप्रधानपदावर शरद पवारांचाही दावा असू शकतो. त्यामुळे पवार हे अतिशय सावधपणे पावलं टाकत असल्याचं दिल्लीत बोललं जातंय.
<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-374917" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzc0OTE3/"></iframe>