पश्चिम बंगाल म्हणजे ममतांची जहागीर नाही, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

पश्चिम बंगाल म्हणजे ममतांची जहागीर नाही, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

'ममता बॅनर्जींना पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र सुरक्षा दलांविरुद्ध तुम्ही गुंडांचा वापर केल्यामुळे तुमची विश्वसनियता पूर्णपणे संपली आहे.'

  • Share this:

कोलकता 16 मे : पश्चिम बंगालमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले पश्चिम बंगाल ही काही ममता बॅनर्जी आणि त्यांच्या भाच्याची जहागीर नाही. हे राज्य भारताचं अविभाज्य अंग आहे. यापुढे दीदींची दादागिरी चालणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला.

मंगळवारच्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय घेत पश्चिम बंगालमधला निवडणूक प्रचार एक दिवस आधीच बंद करण्याचा निर्णय घेतला. 19 तारखेला होणाऱ्या मतदानाचा प्रचार 17 मे रोजी संपणं अपेक्षित होतं. मात्र आयोगाच्या आदेशानंतर 16 मे रोजीच प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे डम डम इथं होणाऱ्या पंतप्रधानांच्या रॅलीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

पंतप्रधान म्हणाले, ममता दीदींना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत आहे. त्यांना हे स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र सुरक्षा दलांविरुद्ध तुम्ही गुंडांचा वापर केल्यामुळे तुमची विश्वसनियता पूर्णपणे संपली आहे. डाव्यांची सत्ता असताना त्यांनी तुमच्या समोर अशीच स्थिती निर्माण केली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणे निवडणूक घेतली होती. आज तुम्ही ते सगळं विसरल्या आहात अशी टीकाही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केली.

आरोप प्रत्यारोप सुरूच

ममता म्हणाल्या, बंगालची जनताच आता विद्यासागर यांची मूर्ती बनवून देईल. हिंसाचारात ज्या महाविद्यालयाचं नुकसान झालं ते 200 वर्ष जुनं होतं. त्याची भरपाई भाजप करून देणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. ही मूर्ती तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी फोडली असेल तर ते आरोप सिद्ध करा नाही तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये घेऊन गेल्याशीवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिला.

तर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात विरोधात जी भाषा वापरली त्याच्या विरोधात भाजपने आज मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध अशी भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जावी अशी मागणी केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

तर मी जी भाषा वापरली ती योग्यच होती. त्याबद्दल मला खेद नाही मी जेलमध्ये जायला तयार आहे अशी प्रतिक्रीया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलीय.

First published: May 16, 2019, 7:42 PM IST

ताज्या बातम्या