VIDEO 'गरज पडली तर शिवसेना आणि नितीश कुमारही भाजपविरोधी आघाडीला साथ देतील'

VIDEO 'गरज पडली तर शिवसेना आणि नितीश कुमारही भाजपविरोधी आघाडीला साथ देतील'

23 मे नंतर कोण किती जागा जिंकतो त्यावरच सगळं गणित अवलंबून राहणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 09 मे : लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार असले तरी प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येण्यासाठी तयारी सुरू केलीय. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी हे प्रयत्न सुरू केला आहेत. गरज पडली तर नितीशकुमार आणि शिवसेनाही भाजपविरोधी आघाडीला साथ देतील असा दावाही करण्यात येतोय. 'सीएनबीसी आवाज'च्या चुनाव अड्डा कर्यक्रमात निकालानंतर काय होऊ शकतं याविषयावर चर्चा झाली.

ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती  आणि चंद्राबाबू नायडू यांना 100 पेक्षा जास्त जागा मिळतील. आणि काँग्रेसच्या मदतीने विरोधी पक्षांची आघाडी बनेल असा दावा तृणमूल काँग्रेसचे समर्थक मनोजित मंडल यांनी केला आहे. अशा वेळी गरज पडलीच तर शिवसेना आणि नितीश कुमारही या आघाडीच्या मदतीसाठी येऊ शकतात असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ पत्रकार आशुतोष म्हणाले, या निवडणुकीत विरोधी पक्षांची एकता जास्त असल्यामुळे भाजपला धोका आहे. एकट्या भाजपला 272 जागा मिळणे कठिण आहे. मात्र या आधी देवेगौडा आणि गुजराल सरकारचा अनुभव पाहिला तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ज्या पक्षाला 150 च्या आसपास जागा मिळतील तोच पक्ष किमान स्थिर सरकार देऊ शकतो असा अनुभव आहे. मनमोहनसिंग यांचं सरकार आणि वाजपेयींचं सरकार टिकलं कारण एक मोठा पक्ष त्यात सहभागी होता.

विरोधकांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान हे पहिले एकत्र येण्याचं आहे. मायावतींनी पंतप्रधानपदासाठी इच्छा दाखवल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी लगेच वक्तव्य दिलं होतं की मायावतींनी अशी इच्छा दाखवायला नको होती. अशा वक्तव्यांमुळे विरोधी पक्षांच्या एकतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये कसं वातावरण आहे हे लक्षात येतं. प्रादेशिक पक्षांच्या सर्वच नेत्यांचं वजन हे सारखच आहे. कोण किती जागा जिंकतो त्यावरच सगळं गणित अवलंबून राहणार आहे असं मत जेष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी व्यक्त केलं.

गेली चार वर्ष शिवसेनेने महाराष्ट्रात विरोधपक्षाचीच भूमिका निभावली. नंतर लोकसभेच्या तोंडावर भाजपसोबत युती केली तरी उद्धव ठाकरेंच्या मनात नरेंद्र मोदी आणि भाजपबद्दल एक अढी असल्याचंही बोललं जातंय. तर नितीश कुमार यांनी अनेक वर्षांची भाजपची साथ 2014मध्ये सोडली होती. त्यामुळे विरोधी पक्षांना काही जागा कमी पडल्या तर या पक्षांची साथ मिळू शकते असं विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटतं.

लोकसभा निवडणुकीचे आता फक्त दोन टप्पे राहिले असून 12 मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यात 7 राज्यांमधल्या 59 जागांसाठी मतदान होत आहे. यात दिल्लीतल्या सर्व 7 जागांचाही समावेश आहे.

First published: May 9, 2019, 10:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading