नवी दिल्ली, 11 मे : शीख दंगलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी माफी मागितली आहे. 'भाषेतील अडचणीमुळे हा गैरसमज झाला. मला हिंदीची जास्त समज नाही,' असं स्पष्टीकरणही पित्रोदा यांनी दिलं आहे.
शीख दंगलीबाबत भाजपकडून करण्यात येत असलेल्या आरोपाबाबत बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले होते की, 'हुआ तो हुआ...गेल्या पाच वर्षांत तुम्ही काय काम केलं ते सांगा.' पित्रोदांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर आता त्यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.
'मला शीख बांधवांच्या भावना दुखावयाच्या नव्हत्या. पण त्यांना माझ्या वक्तव्याने त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. जे झालं ते फार वाईट झालं,' असं म्हणत सॅम पित्रोदांनी सारवासारव केली आहे.
माफी मागितल्यानंतर पित्रोदांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'जगात भारताला मोदींमुळे नव्हे तर राजीव गांधींमुळेच ओळख मिळाली आहे,' असं सॅम पित्रोदांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पित्रोदांच्या या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. 'देश मर्डरर काँग्रेसला त्यांच्या पापांसाठी कधीच माफ करणार नाही,' असं ट्वीट भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. त्यानंतर बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
VIDEO: दुफळी माजवणारा क्रमांक एकचा नेता, लेखातून मोदींवर 'टाईम बॉम्ब'