'दिग्विजय सिंगांना धडा शिकविण्यासाठीच साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी'

'दिग्विजय सिंगांना धडा शिकविण्यासाठीच साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी'

'ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. बेरोजगारी, विकास, अर्थव्यवस्था, जातीयवाद अशा मुलभूत प्रश्नांवरचं लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपने साध्वी प्रज्ञा यांना पुढे आणलं.'

  • Share this:

मुंबई 18 एप्रिल : मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाने त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली. त्यांना काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांचं आव्हान असेल. साध्वींना उमेदवारी जाहीर होताच, दिग्विजय सिंह यांनी त्यांना भोपाळच्या सामाजिक शांततेची आणि नर्मदेची आठवण करून दिली आणि अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरच्या  हिंसक आरोपांची आठवण करुन दिली. सोशल मिडीयातून साध्वी यांना भाजपाने उमेदवारी दिल्यावरून आरोप प्रत्यारोपांचं मोहोळ उठलं आहे. तर हिंदू दहशतवाद हा शब्द जन्माला घालणाऱ्या दिग्विजय सिंगांना धडा शिकविण्यासाठीच भाजपने त्यांना उमेदवारी दिली असा दावा भाजपने केला आहे.

अचानकपणे भाजपाने प्रज्ञासिंग यांना निवडणुकांच्या मैदानात का उतरवलं? यामागे भाजपाचा विचार काय? विकासाचा मुद्दा सोडून भाजपाला पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं आहे का? काँग्रेसला आव्हान देण्यासाठी भाजपाला दुसरा मुद्दा नाही का? अशा सगळ्या प्रश्नांची चर्चा 'न्यूज18 लोकमत'च्या 'बेधडक' कार्यक्रमात झाली.

या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपचे विश्वास पाठक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, राजकीय विश्लेषक   अरुण खोरे आणि लोकमतचे सहायक संपादक पत्रकार अतुल कुलकर्णी  यांनी सहभाग घेतला.

भाजपने चूक केली नाही

साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देण्यात काय चूक आहे? त्या आरोपी नाहीत, न्यायालयात काहीही सिद्ध झालं नाही. लोकशाहीत त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी नाही त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यावर का आक्षेप घेतला जातो हेच कळत नाही असा दावा भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला.

तत्कालीन सरकारने आणि त्यावेळचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठीच साध्वी प्रज्ञा यांना अडकवलं होतं. त्या प्रचाराला छेद देण्यासाठी आणि दिग्विजय सिंग यांना धडा शिकविण्यासाठीच भाजपने साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिली असंही ते म्हणाले.

'हिंदू राष्ट्र'हा डाव

भारताचं हिंदू राष्ट्र करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यांना देशाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा पुसायची आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. साध्वी यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असंही ते म्हणाले.

भाजपला हे शोभतं का?

दहशतवादी कृत्यांचा आरोप असलेल्या व्यक्तिला भाजपने उमेदवारी द्यावी काय हा खरा प्रश्न आहे. आरोप गंभीर असल्याने भाजपने त्यांना उमेदवारी द्यायला नको होती असं मत पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. साधन शुचितेच्या गप्पा करणाऱ्या भाजपला हे शोभणारं नाही असंही ते म्हणाले.

काँग्रेसही दोषी

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं. काँग्रेसचा तोच वारसा आता भाजप पुढे चालवत आहेत. निवडणुकीसाठी वाट्टेल ते करणं ही राजकीय पक्षांची कृती लोकशाहीला घातक आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केलं. भाजप त्याला धार्मिक रंग देत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. बेरोजगारी, विकास, अर्थव्यवस्था, जातीयवाद अशा मुलभूत प्रश्नांवरचं लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपने साध्वी प्रज्ञा यांना पुढे आणलं अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

First published: April 18, 2019, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading