वायनाड, 04 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता उत्तर प्रदेशातील अमेठीसह केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात वायनाड मदरारसंघात निवडणूक होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, राहुल गांधी आज अर्ज भरणार असून कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. राहुल गांधी प्रियांका गांधींसह वायनाडमध्ये रॅली काढणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुस्लिम लीगनं देखील राहुल गांधी यांना पाठिंबा दिला असून प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे. शिवाय, राहुल गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह पाहायाला मिळत आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून निकाल 23 मे रोजी लागणार आहे. दरम्यान, आता वायनाडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
काँग्रेसला मिळणार उभारी?
इतिहसात डोकावून पाहता दक्षिण भारत काँग्रेससाठी लकी ठरला आहे असं म्हणता येते. कारण, पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नव्या उमेदीनं उभं राहण्याचं बळ दक्षिण भारतानं काँग्रेसला दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी वायनाड लकी ठरणार का?हे पाहणं औत्सुक्याचं आहे. यापूर्वी इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी देखील दक्षिण भारतातून निवडणुका जिंकत काँग्रेसला उभारी दिली होती.
अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार? मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना भेटले
इंदिरा गांधींसाठी दक्षिण भारत लकी
आणीबाणीनंतर झालेल्या 1977च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. खुद्द इंदिरा गांधी यांना देखील समाजवादी नेते राज नारायण यांच्याकडून रायबरेली येथे पराभवाचा सामना करावा लागला.
पण, 1978मध्ये कर्नाटकमधील चिकमंगलूर येथे पोटनिवडणुकीची घोषणा झाली. काँग्रेसला उमेद देण्याची ही संधी इंदिरा गांधी यांनी वाया दवडली नाही. चिकमंगलूरमधून इंदिरा गांधी या विजयी झाल्या आणि त्यानंतर 1980च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.
सोनिया गांधींनी देखील मारली बाजी
1998मध्ये देखील काँग्रेसची घडी विस्कटली होती. राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव होता. या कठीण काळात सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. यावेळी सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना जोरदार विरोध केला.
1999मध्ये काँग्रेसनं सोनिया गांधी यांना उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि कर्नाटकातील बेल्लारी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं. यावेळी सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांना आव्हान दिल्यानं निवडणुकीत 'घर की बेटी और विदेशी बहू' असा सामना रंगला. सुषमा स्वराज यांनी अवघ्या 30 दिवसांमध्ये कन्नड भाषा शिकली आणि स्थानिकांशी संवाद साधायला सुरूवात केली.
सुषमा स्वराज यांचा पराभव
निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सोनिया गांधी यांनी 56 हजार मतांनी सुषमा स्वराज यांचा पराभव केला. पण, काँग्रेसला मात्र विजय मिळाला नाही. या पराभवानंतर देखील सुषमा स्वराज यांना केंद्रीय मंत्री बनवलं गेलं. बेल्लारीतील विजयानंतर सोनिया गांधी यांनी स्वत:ला सिद्ध केलं. त्यानंतर 2004मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये युपीएनं विजय मिळवत सरकार स्थापन केलं.
हा सारा इतिहास पाहता राहुल गांधी वायनडमधून विजयी होणार का? काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.
VIDEO: अटकेला घाबरून पळवणाऱ्यांची तुमची जात; मोदी आणि चंद्रकांत पाटलांवर आव्हाडांचा हल्लाबोल