रायबरेली (उत्तर प्रदेश), 15 मे : गांधी घराण्याचा बालेकिल्ला म्हणून या जागेचा उल्लेख होतो अशा रायबरेलीतून चौथ्यांदा सोनिया गांधी लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून यायची गांधी घराण्याची परंपरा आहे. फिरोज गांधींनी ती सुरू केली आणि इंदिरा गांधींनंतर ती सोनिया गांधी पुढे चालवत आहेत. पण या वेळी या परंपरेला छेद देण्यासाठी काँग्रेसच्या गोटातलाच एक मोठा स्थानिक नेता भाजपने सोनियांच्या विरोधात रिंगणात उतरवला आहे. दिनेशप्रताप सिंह हे काँग्रेसचे आमदार ऐन निवडणुकीच्या आधी गोतावळ्यासह भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना लोकसभेचं तिकिट मिळालं.
रायबरेलीत दिनेश सिंह यांचं प्रस्थ मोठं आहे. त्यांना एकेकाळी काँग्रेसनेच बळ दिलेलं आहे. उत्तर प्रदेश विधान परिषदेत ते आमदार होते. अखिलेश सिंह या रायबरेलीच्या स्थानिक बाहुबलीविरोधात त्याचा वापर आता भाजप करून घेत आहे. मागच्या निवडणुकीत भाजपने सोनियांविरोधात अजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. त्यांना जेमतेम पावणेदोन लाख मतं मिळाली. त्यांच्या चौपट मतं घेत सोनिया गांधी यांनी आपली मक्तेदारी सिद्ध केली.
रायबरेलीत काँग्रेस आणि त्यातल्या त्यात गांधी घराणं नेहमीच (एक अपवाद सोडता) पहिल्यापासून निवडून आलं आहे. 1957 मध्ये इथे पहिल्यांदा निवडणूक झाली. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. ते तिथून खासदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून रायबरेलीचं गांधी घराण्याशी सूत जुळलं. पण रायबरेली मतदारसंघाची पहिल्यांदा देशभर चर्चा झाली जेव्हा पंडित नेहरूंची कन्या इथून उभी राहिली. ते साल होतं 1967. इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्या देशाच्या पंतप्रधान झाल्या. इथे आतापर्यंत 16 वेळा लोकसभेची निवडणूक झाली, त्यातल्या 15 वेळा ती काँग्रेसने जिंकली. अपवाद फक्त एक निवडणूक, ज्यात इंदिरा गांधींनाच इथून पराभूत व्हावं लागलं. हा मोठा विजय मिळवला राजनारायण यांनी. आणीबाणीनंतर होणाऱ्या 1977 च्या लोकसभा निवडणुकीत लोकदलाकडून लढताना राजनारायण यांनी इंदिरा गांधींविरोधात जोरदार प्रचार केला होता.
2014 लोकसभा निवडणूक
सोनिया गांधी - काँग्रेस - 5,26,434
अजय अग्रवाल - भाजप - 1,73,721
प्रवेश सिंह - बसप - 63,633
VIDEO : प्रियांका गांधींच्या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, एक जण जखमी