अमेठी/रायबरेली 02 मे : उत्तर प्रदेशातले अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचा गढ असलेले उत्तर प्रदेशातले दोन मतदारसंघ. या दोन्ही मतदारसंघातून गांधी घराण्याचे सदस्य गेल्या अनेक दशकांपासून निवडून येतात. मात्र 2014 नंतर या दोनही मतदासंघातली हवा बदलू लागली आहे. लोक आता वेगळी भाषा बोलत आहेत. नुसतं मोठं नाव असून काय फायदा, आमच्या पदरात काय पडले ते सांगा? असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत. थेट अमेठी आणि रायबरेलीत जाऊन घेतलेला हा आढावा.
जिव्हाळा कमी होतोय
अमेठी आणि रायबरेलीत गांधी घराण्याचा कुठलाही सदस्य डोळे झाकून निवडून येईल अशी आत्तापर्यंत स्थिती होती. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या मतदासंघाचं प्रतिनिधित्व केलं. इथल्या लोकांचं आणि गांधी घराण्याचं नातं जिव्हाळ्याचं राहिलं आहे आणि अजुनही कायम आहे. गांधी घराण्याच्या सदस्यांमुळेच या दोन मतदारसंघाचं नाव सर्व देशात झालं. मात्र आता लोक वेगळी भाषा बोलू लागले आहेत.
#LIVE | गांधी परिवार के नाम से है अमेठी की पहचान, हर गली-हर चौराहे पर स्मृति बनाम राहुल की चर्चा देखिए, आज #ChunavYatra की इस खास पेशकश में https://t.co/9oBhHzM2sV
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) May 2, 2019
विकासाचं बोला!
दिर्घकाळ सत्तेत राहून आणि सर्वोच्च पदांवर राहूनही या भागाचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झाला नाही ही वस्तूस्थिती आहे. लोकांना मुलभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय. रस्ते, विज, पाणी या साध्या सुविधाही अनेक गावांना मिळालेल्या नाहीत. अमेठीजवळचं जगदिशपूर हे गाव राहूल गांधी यांनी दत्तक घेतलं होतं. मात्र राहुल त्या गावाकडे फिरकलेही नाहीत. तर रायबरेलीपासून 6 किलोमीटवर असलेल्या गावात काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदा वीज आली.
हवा बदलत आहे
2014 नंतर इथल्या गावांमध्ये शौचालये आणि घरांची निर्मिती करण्यात आली आहे. काही गावांमध्ये गॅसही मिळाला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांची प्रतिमाही लोकांना भावणारी आहे. अमेठीत पराभव झाल्यानंतरही स्मृती इराणी यांनी अमेठीतला आपला संपर्क कायम ठेवला. त्यामुळे राहुल गांधींना पूर्वीसारखं मताधिक्य मिळणार नाही अशीही शक्यता व्यक्त कली जात आहे. तर रायबरेलीमधून भाजपने काँग्रेसमधून आलेल्या एका नेत्यालाच तिकीट दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोनही मतदारसंघांचे कौल काय लागतात याकडे सगळ्या देशांचं लक्ष लागलंय.