मुंबई, 23 एप्रिल : साध्वी प्रज्ञासिंह यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांना मी श्राप दिला होता. त्यानंतर महिनाभरात त्यांचा मृत्यू झाला असं वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंहनं केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. शिवाय, बाबरी मस्जिद प्रकरणात केलेल्या विधानावरून निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवली होती. हा सारा वाद सुरू असताना आता साध्वी प्रज्ञासिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, 2008मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला आहे. साध्वींची भोपाळमधील उमेदवारी रद्द करावी याकरता मुंबईतील NIA कोर्टात साध्वींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर विचारले असता साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे सर्व लोकप्रियतेसाठी सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आहे.
Pragya Singh Thakur has filed her reply in Mumbai NIA Court against the application by father of one of the victims of 2008 Malegaon blast case seeking to bar her from contesting elections. Thakur says in reply 'applicant has filed this to seek publicity' (file pic) pic.twitter.com/etKdUeER75
दरम्यान, सोमवारी बोलवताना शहीद हेमंत करकरेंविरोधात बरळणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंहची भाजप अध्यक्ष अमित शहांनी पाठराखण केली.'साध्वी प्रज्ञासिंह विरोधात हिंदू दहशतवादाच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याद्वारे जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्यात आलं. कोर्टात त्यांचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले', अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी तिची पाठराखण केली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील साध्वींच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं.
वादानंतर मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांनी मौनव्रत पाळलं आणि एक दिवस आधीच म्हणजेच सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. साध्वींना भाजपने भोपाळमधून दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध रिंगणात उतरवलं आहे. साध्वींनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासोबत भोपाळमधले भाजपचे नेते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत साध्वींनी पूर्णपणे मौन पाळलं होतं. आपल्या वक्तव्यांमुळे उमेदवारीच अडचणीत येऊ नये या विचाराने त्यांनी हा निर्णय घेतला असावा.