निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये राजीनामा पत्रांचा पाऊस

महाराष्ट्रात काँग्रसचे प्रदेशाध्य अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचा प्रभारी मल्लिकार्जुन खरगे या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 04:47 PM IST

निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये राजीनामा पत्रांचा पाऊस

नवी दिल्ली 24 मे : लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार हादरा बसलाय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचाच त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात पराभव झाला. उत्तर प्रदेशात त्यांना फक्त आपलं खातं उघडता आलं. तर अनेक राज्यांमध्ये त्यांना शुन्यावर बाद व्हावं लागलं. पराभवाची जबाबदारी घेत पक्ष पातळीवर अनेक नेते राजीनामे देत असून राहुल गांधी यांच्या ऑफिसमध्ये राजीनाम्यांचा पाऊस पडला आहे.

2014 च्या पराभवानंतर काँग्रेस सावरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी आपल्या स्वभावात बदल करत आक्रमक रुप धारण केलं होतं. त्यामुळे काँग्रेस भाजपला कडवी झुंझ देईल असं चित्र निर्माण झालं होतं. राफेलच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि चौकिदार चोर है ही घोषणा गाजल्याने त्याचा फटका भाजपला बसेल असंही बोललं जात होतं. मात्र या कुठल्याही मुद्याचा परिणाम झाला नाही.

या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. महाराष्ट्रात तर अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते पराभूत झाले. त्यामुळे विविध पदांवर असलेल्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे राजीनामे पाठवायला सुरुवात केलीय. विविध राज्यांचे पक्षाध्यक्ष, प्रचार प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपले राजीनामे राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडे पाठवले आहेत.

तर पक्षाची जबाबदारी घेत खुद्द राहुल गांधी हेच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असंही बोललं जातंय. पराभवाच्या कारणांची चर्चा करण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसची बैठक होणार असून ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे.

प्रियंका गांधींचा प्रभाव नाही

Loading...

उत्तर प्रदेशासोबतच प्रियंका गांधी यांनी पंजाब, हरियाणा, आसाम आणि दिल्लीत प्रचार केला. उत्तर प्रदेशात त्यांनी 12 जागांवर प्रचार केला. त्यातल्या 11 जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. फक्त रायबरेलीची जागा त्यांना वाचवता आली. आसाममधल्या सिलचर, हरियाणातल्या अंबाला, हिस्सार आणि रोहतकमध्ये त्यांनी प्रचार केला. या सर्व जागांवर काँग्रेसचा पराभव झाला.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अमेठीत खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झाला. काँग्रेसने उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 67 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला फक्त रायबरेलीची एक जागा जिंकता आली. तिथेही सोनिया गांधी उभ्या असल्याने आणि सपा-बसपाने ती जागा सोडल्याने काँग्रेसला किमान खातं उघडता आलं.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...