वाराणसीत नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी SPGचं खास 'रक्षा कवच'

वाराणसीत नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी SPGचं खास 'रक्षा कवच'

वाराणसीतला रोड शो हे फक्त निमित्त असून उत्तर प्रदेश हेच नरेंद्र मोदीचं लक्ष्य आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतल्या रोड शोला प्रचंड गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा दलाने विशेष काळजी घेतली आहे. श्रीलंकेतल्या घटनेनंतर सुरक्षा दल अधिकच सतर्क झाले असून वाराणसीत पाच स्तरीय सुरक्षा व्यवस्थेचं कडं उभारलं आहे. गुरुवारी दुपारी बनारस विश्व हिंदू विद्यापीठाच्या समोर असलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी जमलेल्या अफाट गर्दीलाही वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी रोड शोला सुरुवात केली.

सात किलोमीटरचा त्यांचा हा रोड शो असणार आहे. महत्त्वाच्या भागातून हा रोड शो जाणार आहे. संध्याकाळी ते गंगा आरतीमध्येही सहभागी होतील. या दौऱ्यासाठी एसपीजीनं अभेद्य असं सुरक्षा कवच निर्माण केलंय.

SPGचं अभेद्य सुरक्षा कवच

10 हजार पोलीस आणि इतर दलांचे कर्मचारी

 एक हजार पोलीस साध्या वेशात असणार

 SPGचे आयजी वाराणसीत तळ ठोकून

15 आयपीएस अधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी

घरं, दुकान मालकांची कसून पडताळणी

रोड शोच्या मार्गांवरील घरांवर ड्रोननं नजर

गच्चीवर वीट, दगड ठेवण्यास मनाई

हॉटेल्सकडून पर्यटकांची यादी मागवली

गुप्तचर विभागाचे 150 अधिकारी वाराणसीत

यासाठी एकूण 10 हजार पोलीस कर्मचारी आणि इतर सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आलेत.  एक हजार पोलीस कर्मचारी साध्या वेशात नजर ठेवत आहेत. 15 आयपीएस अधिकारी आणि एसपीजीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या सुरक्षेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल.

रोड शोच्या मार्गावर जी दुकानं आणि घरं आहेत, त्यांच्या मालकांची पडताळणी सुरूय. इतर घरांवर ड्रोनच्या सहाय्यानं नजर ठेवण्यात येते आहे. गच्चीवर वीट, दगड तसंच काठ्या ठेवण्यास मनाई करण्यात आलीये. सर्व हॉटेल्सकडून पर्यटकांची सविस्तर यादी मागवण्यात आलीये. खबर आहे की गुप्तचर विभागाचे 150हून जास्त अधिकारी वाराणसीत आहेत. रोड शो दरम्यान ते गर्दीत मिसळून करडी नजर ठेवतील.

या रोड शोसाछी 15 दिवसांपूर्वीच एसपीजी कामाला लागलं होतं. मोदींच्या हेलिकॉप्टर मार्गावरही एसपीजीनं तालिम करून आढावा घेतला. सुरक्षेचा प्रोटोकॉल तोडून लोकांमध्ये मिसळणं मोदींना आवडतं, आणि ते त्यांनी अनेकदा केलंय. त्यामुळे, एसपीजीसमोरं आव्हान मोठं असणार आहे.

'एनडीए'च्या नेत्यांची उपस्थिती

26 एप्रिलला पंतप्रधान सकाळी साडे अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, रामदास आठवले यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading