News18 Lokmat

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीतल्या 'रोड शो'साठी अशी आहे अभेद्य सुरक्षाव्यवस्था

सात किलोमिटरच्या 'रोड शो'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 05:20 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीतल्या 'रोड शो'साठी अशी आहे अभेद्य सुरक्षाव्यवस्था

नवी दिल्ली 24 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्या आधी उद्या म्हणजे गुरुवारी 25 एप्रिलला ते भव्य रोड शो करत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 2014मध्येही त्यांनी असाच रोड शो केला होता. त्यासाठी सुरक्षा दलाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षाव्यवस्थेत ड्रोनचीही मदत घेण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन रोड शो ला सुरुवात करतील. सात किलोमीटरचा त्यांचा हा रोड शो असणार आहे. महत्त्वाच्या भागातून हा रोड शो जाणार असून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ते गंगा आरतीमध्येही सहभागी होतील. या दौऱ्यासाठी एसपीजीनं अभेद्य असं सुरक्षा कवच निर्माण केलंय.

SPGचं अभेद्य सुरक्षा कवच

10 हजार पोलीस आणि इतर दलांचे कर्मचारी

 एक हजार पोलीस साध्या वेशात असणार

Loading...

 SPGचे आयजी वाराणसीत तळ ठोकून

15 आयपीएस अधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी

घरं, दुकान मालकांची कसून पडताळणी

रोड शोच्या मार्गांवरील घरांवर ड्रोननं नजर

गच्चीवर वीट, दगड ठेवण्यास मनाई

हॉटेल्सकडून पर्यटकांची यादी मागवली

गुप्तचर विभागाचे 150 अधिकारी वाराणसीत

यासाठी एकूण 10 हजार पोलीस कर्मचारी आणि इतर सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आलेत.  एक हजार पोलीस कर्मचारी साध्या वेशात नजर ठेवणार आहेत. एसपीजीचे आयजी अलोक शर्मा वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन सुरक्षेचं नियोजन करतायेत. 15 आयपीएस अधिकारी आणि एसपीजीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या सुरक्षेच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल.

रोड शोच्या मार्गावर जी दुकानं आणि घरं आहेत, त्यांच्या मालकांची पडताळणी सुरूय. इतर घरांवर ड्रोनच्या सहाय्यानं नजर ठेवण्यात येतेय. गच्चीवर वीट, दगड तसंच काठ्या ठेवण्यास मनाई करण्यात आलीये. सर्व हॉटेल्सकडून पर्यटकांची सविस्तर यादी मागवण्यात आलीये. खबर आहे की गुप्तचर विभागाचे 150हून जास्त अधिकारी वाराणसीत आहेत. रोड शो दरम्यान ते गर्दीत मिसळून करडी नजर ठेवतील.

या रोड शोसाछी 15 दिवसांपूर्वीच एसपीजी कामाला लागलंय. मोदींच्या हेलिकॉप्टर मार्गावरही एसपीजीनं तालिम करून पाहिलीये. सुरक्षेचा प्रोटोकॉल तोडून लोकांमध्ये मिसळणं मोदींना आवडतं, आणि ते त्यांनी अनेकदा केलंय. त्यामुळे, एसपीजीसमोरं आव्हान मोठं असणार आहे.

'एनडीए'च्या नेत्यांची उपस्थिती

26 एप्रिलला पंतप्रधान सकाळी साडे अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यावेळी भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान, रामदास आठवले यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...