वर्ध्याच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या 'हिंदू दहशतवाद' शब्दावरून पुन्हा सुरू झाली चर्चा

वर्ध्याच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या 'हिंदू दहशतवाद' शब्दावरून पुन्हा सुरू झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेला 'हिंदू दहशतवाद' या शब्दावरून 2013मध्ये जोरदार आरोप - प्रत्यारोप झाले होते.

  • Share this:

वर्धा,  01 एप्रिल : वर्ध्यातील जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी 'हिंदू दहशतवाद' या शब्दावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "हिंदूंना बदनाम करण्याचं पाप हे काँग्रेसनं केलं आहे. काँग्रेसमुळे हिंदू बदनाम झाले," असं सांगत 'हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? हे पाप कुणी केलं? असा सवालही मोदींनी उपस्थितांना केला. यावरून पुन्हा एकदा हिंदू दहशतवाद या शब्दावर चर्चा सुरू आहे.  नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर 'हिंदू दहशतवाद' हा शब्द आला कुठून? आणि सुशीलकुमार शिंदे यांचा काय संबंध हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे.

जानेवारी 2013मध्ये जयपूर इथे बोलताना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार प्रहार केले होते. आरएसएसच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं जातं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर आक्रमक होत भाजपनं सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र डागलं. शिवाय शिंदेंनी माफी मागावी अशी मागणी देखील केली. त्यानंतर वाढता दबाव पाहता सुशीलकुमार शिंदे यांनी माघार घेतली. 'मी दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडलं नाही. तसेच 'हिंदू दहशतवाद' असा उल्लेख न करता 'भगवा दहशतवाद' असं म्हटलं होतं. पण, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला', असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं. शिंदे यांच्या याच विधानावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे.

शरद पवार आणि भगवा दहशतवाद

दरम्यान, 10 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मालेगावच्या घटनेसाठी भगवा दहशतवाद हा शब्द मी वापरला होता असं म्हटलं होतं.

वर्ध्यातील सभेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्यातील जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मतांसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही थराला जातील. हिंदूंना बदनाम करण्याचं पाप हे काँग्रेसनं केलं आहे. काँग्रेसमुळे हिंदू बदनाम झाले. हिंदू दहशतवाद हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना केला. हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? हे पाप कुणी केलं? काँग्रेसच्या साऱ्या बाबी आता समोर येत आहेत. पण, काँग्रेसला आता पापापासून मुक्ती नाही. देशानं काँग्रेसला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेते देखील मैदान सोडून पळत असून त्यांनी अल्पसंख्याक मतदारसंघ निवडल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं नाव घेणं मात्र टाळलं.

VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले; मोदींचं UNCUT भाषण

First published: April 1, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading