नवी दिल्ली 13 मे : प्रचाराचा शवेटचा टप्पा राहिलेला असताना नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वच विरोधी पक्षांचे नेते तुटून पडले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता मायावती यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केलाय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मायावतींच्या वक्तव्यांवरून त्या पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत हेच स्पष्ट होतं असं जेटलींनी म्हटलं आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायावतींविरुद्ध झालेल्या गेस्ट हाऊस प्रकरणाचा उल्लेख केला होता. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मायावतींवर हल्ला केला होता. सध्या समाजवादी पक्ष आणि बसपा एकत्र निवडणूक लढवत आहे. पंतप्रधानांनी त्या प्रकरणाचा उल्लेख केल्याने मायावती भडकल्या आहेत.
त्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. भाजपचे नेते, मंत्री, खासदार जेव्हा मोदींना भेटतात तेव्हा त्यांना भिती वाटते. मोदींनी जसं आपल्या पत्नीला सोडलं तसं आपले पती तर करणार नाहीत ना अशी भिती महिलांना वाटते असं मायावती यांनी म्हटलं होतं.
Behan Mayawati - She is firm on becoming a Prime Minister. Her governance, ethics and discourse stoops to an all-time low. Her personal attack today on the Prime Minister exposes her as unfit for public life.
— Chowkidar Arun Jaitley (@arunjaitley) May 13, 2019
मोदी हे अत्यंत घृणास्पद राजकारण करत असल्याचा आरोपही मायावतींनी केला होता. जेटली म्हणाले, मायावतींची प्रशासकीय क्षमता, विचारांची क्षमता आणि प्रत्यक्षातलं आचरण हे अत्यंत खालच्या पातळीवर घसरलं आहे. त्यांना पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा आहे. अशी व्यक्ती पंतप्रधानपदासाठी मुळीच लायक नाही असंही ते म्हणाले.
पश्चिम बंगालमध्येही वाद
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमधील वाद सर्वश्रृत आहे. पण, हा वाद अद्याप देखील शमलेला नाही. दोन्ही पक्षांतील नेते परस्परांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. अमित शहा यांच्या रॅलीला परवानगी नाकारल्यामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाधवपूर येथे रॅली आयोजित करण्यात आली होती.
पण, त्यांच्या रॅलीला देण्यात आलेली परवानगी आता ममता बॅनर्जी सरकारनं रद्द केली आहे. शिवाय, हेलिकॉप्टर उतरवण्यास देखील परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानंतर आता भाजप निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार करणार आहे. त्यामुळे पुढं नेमकं काय घडणार हे पाहावं लागणार आहे. भाजपनं लोकसभेकरता पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं असून त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.