मुंबई 14 मे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा असताना पुन्हा एकदा गांधी हत्येचा विषय प्रचारात आला आहे. कमल हसन यांनी तामिळनाडूतल्या एका प्रचार सभेत नथूराम गोडसे हा स्वतंत्र भारतातला पहिला हिंदू दहशतवादी असल्याचं वक्तव्य केलं आणि वादाची ठिणगी पडली. हा विषय उपस्थित करून ते फुटीचं राजकारण करत असल्याचा आरोप आता करण्यात येतोय.
निवडणुकीच्या प्रचारात नथूराम गोडसे आणि गांधी हत्या हा विषय कायम येत राहिला आहे. काँग्रेस या मुद्याचा वापर करून कायम भाजपवर टीका करण्याचं काम करत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसने हा विषय टाळला आहे. अशा मुद्यांचा भाजप वापर करून हिंदुत्वाचं कार्ड खेळतं त्यामुळे काँग्रेसने हा विषय टाळला आहे. त्याचा फटकाही काँग्रेसलाच बसल्याने काँग्रेस आता सावध झाला आहे.
मात्र नुकतेच राजकारणात आलेले कमल हसन यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. गांधीजींची हत्या होऊन आता 71 वर्ष होत आहेत. त्यावेळी नेमकं काय झालं, नथुराम कोण होता हे सर्व आता जगाला माहित आहे असं असतानाही कायम हा मुद्दा उपस्थित करून ऐकमेकांना टार्गेट करण्यात येतं कमल हसन यांनीही तेच केलं असं मत पत्रकार मिलिंद राजगुरे यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18 लोकमत'च्या बेधडक कार्यक्रमात ते बोलत होते.
नथूराम गोडसे हा हिंदुत्ववादी होता हे खरं असलं तरी त्याच्या मागे कुठलीही संघटना किंवा पक्ष नव्हता हे चौकशीअंती सिद्ध झालं तरी कायम संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांना दोष दिला जातो तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या रागावरून नथुरामने हत्या केली होती त्यामागे व्यक्ती,पक्ष किंवा संघटना नव्हती असं मत लेखक गिरीश दाबके यांनी व्यक्त केलं.
तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे म्हणाले, नथूरामच्या मागे कुठली संघटना नसली तरी त्याची मानसिकता ही मनुवादीच होती. महात्मा गांधी अस्पृश्यता उद्धाराचं जे कार्य करत होते त्याचा काही लोकांना राग होता. त्यांना समाजात समाजात भेद हवा होता जातीवरून भेदभाव करणारी ही मंडळींना मानणारा नथुराम होता असं मतही वारे यांनी व्यक्त केलं.