VIDEO : 'पश्चिम बंगालमधला हिंसाचार हा डावे, काँग्रेस आणि तृणमूलचं देणं'

VIDEO : 'पश्चिम बंगालमधला हिंसाचार हा डावे, काँग्रेस आणि तृणमूलचं देणं'

पश्चिम बंगालमध्ये ज्या ज्या वेळी सत्तांतर झालं त्या प्रत्येक वेळी हिंसाचार झाला आहे.

  • Share this:

मुंबई 15 मे : पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीला गालबोट लागलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या सहा टप्प्यात प्रत्येक वेळी हिंसाचार झाला. आणि शेवटचा टप्पा राहिलेला असताना तो हिंसाचार वाढलेला आहे. बंगालमध्ये आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा सत्तांतर झालं त्या प्रत्येक वेळी हिंसाचारच झाला असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी यावेळी चर्चेत बोलताना व्यक्त केलं. तर डावे, काँग्रेस आणि तृणमूलच्या राजकीय संस्कृतीमुळेच बंगालमध्ये हिंचाराची बीजं रुजली गेली असा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय.

या कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे, पत्रकार हेमंत देसाई, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी सहभाग घेतला.

देसाई म्हणाले, काँग्रेसचे सिद्धार्थ शंकर रे यांची सत्ता जाऊन जेव्हा डावे सत्तेवर आले तेव्हाही हिंसाचार झाला. त्यानंतर डाव्यांची 35 वर्षांची राजवट जाऊन जेव्हा ममता बॅनर्जी सत्तेत आल्या तेव्हाही हिंसाचार झाला आणि आताही हिंसाचार होत आहे. बंगालच्या राजकीय संस्कृतीचा हिंसाचार हा भागच झाला आहे अशी टीकाही त्यांनी केली.

बंगालमधला राजकीय हिंसाचार

वर्ष            हिंसक घटना    मृत्यू

2016          91                 205

2015          131               184

2013                                26

1977 ते 1996 या 19 वर्षात 28 हजार नागरीक राजकीय हिंसेचे बळी

तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची कार्य संस्कृती ही कायम हिंसकच राहिली असल्याचं मत कम्युनिष्ट नेते अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केलं. डाव्यांची सत्ता असताना ममता बॅनर्जी यांनी प्रचंड प्रमाणात हिंसेचा आधार घेतला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये 90 टक्के जागा या तृणमूलला मिळाल्या. 80 टक्क्यांपेक्षा जास्त पंचायतींमध्ये तृणमूलची लोकांची एकमताने निवड झाली म्हणजे तिथे किती दहशत असे याचा विचार करा असंही ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा बळी जातोय. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाच खुद्द टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं असतानाही उलट भाजपवरच आरोप करण्याचा प्रयत्न होत असल्याचं मत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला. हा हिंसाचार हा डाव्यांनी, काँग्रेसने आणि तृणमूलनेच सुरू केला असा आरोपही त्यांनी केला.

डावे, काँग्रेस, भाजप आणि तृणमूल यांच्या भांडणात लोकशाहीचा बळी जातोय असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं.

First published: May 15, 2019, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading