नवी दिल्ली, 6 एप्रिल : 'शत्रुचा शत्रु तो आपला मित्र' या न्यायाप्रमाणे कट्टर विरोधक असलेले दिल्लीतील आम आदमी पार्टी आणि काँग्रेसनं अखेर लोकसभा निवडणुकीकरता दिल्ली आणि हरियाणामध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होत्या. पण, 'आप'शी हातमिळवणी करण्यासाठी मात्र दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील बोलणी फिस्कटली होती. 'आप'नं देखील त्यानंतर 'एकला चलो' म्हणत दिल्लीतील लोकसभेकरता तयारी केली होती. पण, अखेर काँग्रेस-'आप'नं हातमिळवणी केली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित केला असून दिल्लीत काँग्रेसला तीन जागा मिळणार आहेत. तर, हरियाणामध्ये करनाल, फरीदाबाद आणि गुरुग्राम या तीन जागा काँग्रेसनं 'आप'ला द्यायची तयारी केली आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल.
राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली बैठक
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित, पीसी चाको हजर होते. तत्पूर्वी काँग्रेसनं सर्व जिल्हाध्यक्षांची देखील बैठक बोलावली होती. साऱ्या राजकीय स्थितीचा आढावा घेत अखेर काँग्रेसनं 'आप'शी हातमिळवणी करण्यास तयारी दर्शवली आहे.
काँग्रेस -'आप' एकत्र आल्यानं आता भाजपला दिल्लीत मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दिल्लीतील सात जागांवर कोण बाजी मारणार हे देखील पाहावं लागणार आहे. दिल्लीत सध्या 'आप'ची सत्ता आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहेत. त्यामुळे या निकालाअंती काँग्रेस-'आप'चा एकत्र आल्यानं परिणाम काय झाला हे स्पष्ट होईल.
VIDEO: नववर्षाचा जल्लोष; उर्मिला मातोंडकर यांनी लेझीमच्या तालावर धरला ठेका