'राफेल'मध्ये भ्रष्टाचार, मात्र त्याचे डिटेल्स माहीत नाहीत, राहुल गांधींचा VIDEO व्हायरल

'राफेल'मध्ये भ्रष्टाचार, मात्र त्याचे डिटेल्स माहीत नाहीत, राहुल गांधींचा VIDEO व्हायरल

तुम्हाला या कराराविषयी पूर्ण माहिती नाही तर गेली वर्षभर तुम्ही कशाच्या आधारावर आरोप करत आहात असा सवाल भाजपने केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 14 मे : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलमधल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून गेले वर्षभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता. 'चौकीदार चोर है' ही त्यांची घोषणाही चांगलीच गाजली. मात्र राफेलवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांना आता ट्रोल केलं जातंय. एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिलं होतं.

राहुल यांनी एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राफेल मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तुम्ही सत्तेत आलात तर हा करार रद्द करणार का असा प्रश्न त्यांना नंतर विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राहुल म्हणाले, याचं उत्तर आत्ताच देता येणार नाही. कारण त्याचे डिटेल्स मला माहीत नाहीत. मी विरोधी पक्षात आहे. संरक्षण मंत्रालयाला, हवाई दलाला त्याबाबत विचारावं लागेल असं उत्तर त्यांनी दिलं.

याच त्यांच्या उत्तरावर भाजपने त्यांना आता प्रश्न विचारला आहे. तर सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केलं जातंय. तुम्हाला या कराराविषयी पूर्ण माहिती नाही तर गेली वर्षभर तुम्ही कशाच्या आधारावर आरोप करत आहात असा प्रश्न त्यांना भाजपने विचारला आहे. तुम्ही देशाच्या जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोपही भाजपने राहुल गांधी यांच्यावर केला आहे.

राफेल ही लढाऊ विमाने खरेदी करताना त्यात 30 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहेत. हिंदू या वृत्तपत्राने त्याबाबत अनेक खुलासे केले होते. संसदेमध्येही या प्रश्नावर चर्चाही झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यावर उत्तरही दिलं होतं. मात्र हा वाद शांत झाला नाही.

आता हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या विचाराधीन आहे. या आधी सुप्रीम कोर्टाने यात उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे भ्रष्टाचार नाही, तसच चौकशीही गरजही नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काही नवी कागदपत्र प्रसिद्ध झाली होती. यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भुषण यांनी नवी याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टाला आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती. कोर्ट त्यावर निर्णय देणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या या मुलाखतीने काँग्रेला फटका बसण्याचीच शक्यता व्यक्त होतंय.

First Published: May 14, 2019 09:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading