मायावतींनीही ठोकला पंतप्रधानपदावर दावा, या जागेवरून लढणार पोटनिवडणूक?

21 मे रोजी सर्व पक्षांची नवी दिल्लीत बैठक होणार असून त्यांना त्यात पंतप्रधानपदाचा आघाडीचा उमेदवार ठरेल अशी घोषणा चंद्रबाबू नायडू यांनी केली होती.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 06:48 PM IST

मायावतींनीही ठोकला पंतप्रधानपदावर दावा, या जागेवरून लढणार पोटनिवडणूक?

लखनऊ 07 मे : लोकसभेच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. आता फक्त दोन टप्प्यांचं मतदान बाकी आहे. यावेळी कुठल्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही असेही अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रादेशीक पक्षांच्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बसपच्या प्रमुख मायावती यांनीही अप्रत्यक्षपणे आपण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गरज पडली तर लोकसभेची पोटनिवडणुक लढविण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

देशाचा नवा पंतप्रधान कोण असेल हे 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र अनेक नेत्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहेत. यात प्रमुख आहेत बसपाच्या नेत्या मायावती. 2014 मध्ये मायावतींना उत्तर प्रदेशातून एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी कधी काळी कट्टर शत्रू असलेले सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मायावतींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आंबेडकरनगर इथं झालेल्या जाहीर सभेत मायावती म्हणाल्या, जर काही चांगलं झालं तर मी याच मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवू शकते. या आधीही मी अनेकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. याचा अर्थ हा मायावतींनी पंतप्रधानपदावर आपली दावेदारी सांगितली असा काढला जातोय.

तर शरद पवार, चंद्रबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. राजकीय फेरजुळवणी करता येवू शकते का याची चाचपणी सर्वच नेते करत आहेत. पण 23 मे रोजी लागणाऱ्या निकालांवर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.

23 मे पर्यंत सर्वच नेते हा खेळ खेळतील आणि निकालानंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा दावा भाजपने केला आहे. तर 21 मे रोजी सर्व पक्षांची नवी दिल्लीत बैठक होणार असून त्यांना त्यात पंतप्रधानपदाचा आघाडीचा उमेदवार ठरेल अशी घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केली होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...