नवी दिल्ली 15 मे : लोकसभेच्या निवडणूक निकालांना अजुन आठ दिवस राहिले आहेत. 23 मे रोजी निकाल असून त्यानंतर कुणाचं नवं सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर विविध गोष्टींची तयारी ही सतत सुरू असते. येणाऱ्या नव्या सरकारला जुलै महिन्यात आपला पूर्ण अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे. त्यादृष्टीने अर्थमंत्रालयाने तयारी सुरू केलीय.
सरकारं येतात आणि जातात व्यवस्था मात्र कायम राहते असं म्हणतात. व्यवस्थेतलं हेच सातत्य प्रशासनाने कायम ठेवावं अशी अपेक्षा असते. मोदी सरकारने फेब्रुवारी महिन्यात आपला हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. कारण लवकरच निवडणुका जाहीर होणार असल्याने घटनेप्रमाणे पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार हा नव्या सरकारला असतो. त्यामुळे अशा काळात हंगामी अर्थसंकल्प सादर केला जातो.
येणारं नवं सरकार हे जुलै महिन्यात आला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यादृष्टीने अर्थमंत्रालयाने तयारी सुरू केली असून मंत्रालयातचे वरिष्ठ अधिकारी विविध उद्योगांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेणार आहेत. पायाभूत सुविधा, वाहन-उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, टेलिकॉम, अशा विविध उद्योगातल्या लोकांशी अधिकारी चर्चा करणार असून त्यांची मतं ऐकूण घेतली जाणार आहेत.
नवीन रोजगार तयार करणं, उद्योगाला चालना देणं, सुधारणा करणं, गुंतवणूकीसाठी वातावरण तयार करणं ही आव्हानं नव्या सरकारला पेलावी लागणार आहेत.
राजकीय हालचालींना दिल्लीत वेग
लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना राजधानी दिल्लीतील राजकीय हलचालांनी वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.