Exit Poll 2019 : राजस्थानमध्ये कर्नाटक पॅटर्न; काँग्रेसला दाखवला ‘हात’

Exit Poll 2019 : राजस्थानमध्ये कर्नाटक पॅटर्न; काँग्रेसला दाखवला ‘हात’

राजस्थानच्या जनतेनं काँग्रेसचा हात झिडकारल्याचं दिसून येत आहे.

  • Share this:

जयपूर, 19 मे : राजस्थानमध्ये कुणाची हवा? लोकसभा निवडणुकीत राजस्थानचं मैदान कोण मारणार? मोदींची जादू चालणार का? असे एका ना अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. विधानसभेत काँग्रेसनं भाजपला धुळ चारत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे वर्षाच्या आत झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला धोबीपछाड देणार अशी चर्चा होती. पण, Network18च्या एक्झिट पोलमध्ये मात्र राजस्थानच्या जनतेनं काँग्रेसला हात दाखवत भाजपचा हात धरल्याचं दिसून येत आहे. कारण, Network18च्या एक्झिट पोलनुसार भाजपला तब्बल 22 ते 25, तर, काँग्रेसला केवळ 01 ते 02 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींची जादू कायम असल्याचं Network18च्या एक्झिट पोलनुसार तरी दिसून येत आहे. 2014मध्ये राजस्थानमध्ये भाजप सर्व अर्थात 25 जागा जिंकल्या होत्या. राजस्थानात दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या होत्या. दोन टप्प्यांमध्ये यंदा विक्रमी 68.2 टक्के मतदान झालं होतं. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपविरोधी वारं असल्याचं मानलं जातं होतं. काँग्रेसनेही कंबर कसून जोरदार प्रचार केल्याने या राज्यात कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज बांधणं कठीण होतं. पण, Network18च्या एक्झिट पोलनुसार भाजपचा वारू उधळलेला दिसून येत आहे.

विधानसभेप्रमाणे निकाल नाही

2014 मध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातही सत्ता भाजपची होती. लोकसभेच्या सगळ्याच्या सगळ्या 25 जागा भाजपला मिळाल्या होत्या. हे राज्य देशात सत्ता मिळवून देण्यात भाजपसाठी महत्त्वाचं ठरलं होतं. त्याच राजस्थानात विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला पराभवाची चव चाखावी लागली होती. वसुंधराराजेंवर जनतेचा विश्वास नसल्याने पराभव झाला, असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि युवा नेते - उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा करिष्मा चालणार अशी शक्यता होती. पण, Network18च्या एक्झिट पोलमध्ये तरी हा करिष्मा दिसत नाही.

मतदानाची टक्केवारी

2019 : 68.2%

2014 : 64.2%

मतदारांची संख्या

मतदारांची संख्या

महिला मतदार

20,346,580

पुरुष मतदार

22,648,051

एकूण मतदार

42,994,631

एक्झिट पोलनुसार सध्या भाजपचं पारडं जड असलं तरी निकालाच्या दिवशी घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

या दोन जागांवर आहे लक्ष

राजस्थानमध्ये दोन जागांवर भाजपला पूर्वी आपल्याच पक्षात असलेल्या दिग्गजांविरोधात लढा द्यावा लागला. माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह पश्चिम राजस्थानमध्ये असलेल्या सीमेनजिकच्या बाडमेर-जैसलमेर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. मानवेंद्र गेल्या निवडणुकांपर्यंत भाजपच्या गोटात होते.

भाजपचे आमदार म्हणूनही ते बाडमेरच्या शिव मतदारसंघातून निवडून आले होते. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी वडील जसवंत सिंह यांना भाजपने तिकीट दिलं नाही आणि जसवंत सिंहांचं भाजपबरोबर पटेनासं झालं. तेव्हा मानवेंद्रही पक्षापासून दुरावले. राजस्थानात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी पक्षाशी फारकत घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मानवेंद्र सिंह यांना काँग्रेसने बाडमेर- जैसरमेरवर उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार कैलाश चौधरी लढत देत आहेत. ही लढत चुरशीही ठरत आहे.

राजस्थानमध्ये सीकर लोकसभा मतदारसंघातही असाच जुन्या आप्तांचा आपसात लढा आहे.

महरिया विरुद्ध सुमेधानंद

भाजपचे या प्रांतातले दिग्गज नेते असलेल्या सुभाष महरिया यांनाही भाजपने मागच्या निवडणुकीत तिकीट दिलं नाही. सुभाष महरिया वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. ते भाजपच्या तिकिटावर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले होते. पण 2014 मध्ये भाजपने त्यांचा पत्ता कट करत दुसरा उमेदवार उभा केला. त्या वेळी ते अपक्ष म्हणून उभे राहिले पण भाजपच्या उमेदवारापुढे हार पत्करावी लागली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पहिल्यांदाच ते काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत महरियांना हरवणारे भाजप खासदार स्वामी सुमेधानंद यांच्यापुढे त्यांचं आव्हान किती टिकणार हे लवकरच स्पष्ट होईल.

जयपूर ग्रामीणकडे लक्ष

जयपूर ग्रामीण या मतदारसंघाकडे राजस्थानच नाही, तर देशाचं लक्ष लागलं आहे. दोन ऑलिम्पियन एकमेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. क्रीडा क्षेत्रातली दोन दिग्गज नावं एकमेकांपुढे असल्याने या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

केंद्रीय मंत्री खासदार राज्यवर्धनसिंह राठोड यांना भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राज्यवर्धन यांनी नेमबाजीत ऑलिम्पिकचं रौप्य पदक जिंकलं होतं. मुळात भारतीय लष्करात होते. कर्नल पदापर्यंत त्यांची बढती झाली होती. त्यानंतर 2013 मध्ये लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 2014 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. जयपूर ग्रामीण मधून राज्यवर्धन मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आणि केंद्रात राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आलं.

या मतदारसंघातून राज्यवर्धन याना टक्कर द्यायला काँग्रेसनेही क्रीडापटूला उभं केलं आहे. काँग्रेसच्या उमेदवार आहेत कृष्णा पुनिया. आघाडीच्या अॅथलिट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कृष्णा पुनिया भारतातर्फे तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये खेळल्या. थाळी फेकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. राजस्थान विधानसभेच्या आमदार म्हणून कृष्णा गेल्या वर्षी निवडून आल्या. 2013 मध्ये कृष्णाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

First published: May 19, 2019, 8:11 PM IST

ताज्या बातम्या