गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं निलंबन मागे घेतल्याने भडकल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या

गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं निलंबन मागे घेतल्याने भडकल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या

'सर्वच पक्षांनी महिलांबाबत अतिशय संवेदनशील असावं. राजकारणात काही चांगलं व्हावं. स्त्रियांबद्दलचा दुष्टीकोन बदलला पाहिजे.'

  • Share this:

नवी दिल्ली 17 एप्रिल : निवडणूक प्रचारात महिलांबाबत होणाऱ्या वक्तव्यावरून राजकारण होत असतानाच आज काँग्रेसला घरचा आहेर मिळाला. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांचं निलंबन मागे घेण्याच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि चर्चेला तोंड फुटलं. महिला सन्मानाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला हे शोभतं का असं ट्विटरवर विचारलं जाऊ लागलं. याच विषयावर चर्चा झाली 'न्यूज18 इंडिया'च्या 'सुलगते सवाल' या कार्यक्रमात. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी झाले नाहीत.

नेमकं काय झालं?

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सप्टेंबर 2018मध्ये राफेलच्या भ्रष्टाचारावर मथुरा इथं पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व कार्यकर्त्याचं निलंबन पक्षाने मागे घेतलं. त्यामुळे प्रियंका दुखावल्या गेल्या आणि त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षासाठी शिवीगाळ सहन केली, ट्रोलिंग सहन केलं, घाम गाळला, मात्र आपल्यासोबत दुर्व्यवहार करणाऱ्यांना कुठलीही शिक्षा न करता त्याचं निलंबन मागे घेण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली होती.

सर्वच पक्ष सारखे

निवडणुका असल्याने मतांसाठी राजकीय पक्ष कुठल्याही थराला जातात. प्रियंका या काँग्रेसच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आहेत. त्यांच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना पुन्हा पक्षात घेत असतील तर ते अतिशय चुकीचं असल्याचं मत पत्रकार रामकृपाल सिंह यांनी व्यक्त केलं. मतांसाठी राजकीय पक्ष काहीही करायला तयार होतात असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

फक्त माफी पुरेशी नाही

तर त्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली आहे आणि पुन्हा अशी चूक न करण्याची हमी दिल्याने निलंबन मागे घेतलं असावं असं मत राजकीय विश्लेषक दुष्यंत नागर यांनी व्यक्त केलं. नागर यांच्या या मतावर सर्वच पाहुण्यांनी टीका केली. माफी मागितली असली तरी अशा लोकांना शिक्षा का केली नाही असा सवाल भाजपचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी केला.

महिलांचा सन्मान व्हावा

काँग्रेस सारखा मोठा पक्ष आपल्या प्रवक्त्यांबद्दलच असा वागत असेल तर इतर महिलांचं काय असं मत निघत अब्बास यांनी व्यक्त केलं. सर्वच पक्षांनी महिलांबाबत अतिशय संवेदनशील असावं असा सल्लाही त्यांनी राजकीय पक्षांना दिला. अशा गोष्टींसाठी सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असून कुणीही त्यापासून अलिप्त नाही. राजकारणात काही चांगलं व्हावं. स्त्रियांबद्दलचा दुष्टीकोन बदलावा असं मत विश्लेषक निघत अब्बास यांनी व्यक्त केलं.

First published: April 17, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading