गुलाम नबी आझादांची पलटी, आता म्हणतात काँग्रेस पंतप्रधानपदासाठी तयार

गुलाम नबी आझादांची पलटी, आता म्हणतात काँग्रेस पंतप्रधानपदासाठी तयार

भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व एकत्र आहेत असं दाखवत असले तरी पंतप्रधान पदासाठी त्यांना उमेदवार निवडता आला नाही आणि महाआघाडीही करता आली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 17 मे : काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आता पलटी मारली आहे. काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही हे खरं नाही. काँग्रेस हाच सर्वात मोठा आणि जुना पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हालाच सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाच वर्ष स्थिर सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसच सर्वात योग्य पक्ष आहे असंही ते म्हणाले. या आधी त्यांनी नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवणं हेच काँग्रेसचं सर्वात मुख्य उद्दीष्ट आहे असं म्हटलं होतं.

या आधी गुरुवारी त्यांच्या वक्तव्याची देशभर चर्चा झाली होती. पंतप्रधानपदासाठी काँग्रेसला ऑफर दिली नाही तरी पक्ष तो प्रतिष्ठेचा मुद्दा करणार नाही असं त्यांनी बिहारमध्ये बोलताना स्पष्ट केलं होतं. भाजप आणि नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं मुख्य धोरण आहे असंही ते म्हणाले होते.

आझादांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जात होतं. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावरून विरोधी पक्षांमध्ये अजुनही मतभेद आहेत. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व एकत्र आहेत असं दाखवत असले तरी पंतप्रधान पदासाठी त्यांना उमेदवार निवडता आला नाही आणि महाआघाडीही करता आली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेकडे पाहिलं जात आहे.

काँग्रेसला किती जागा मिळणार, काय म्हणाले राहुल गांधी?

लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. निवडणुकीच्या निकालाबाबत अनेकांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसला या निवडणुकीत किती जागा मिळतील, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आल्यावर त्यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'देशभरात सरकारविरोधी वातावरण आहे. नोटबंदी, जीएसटी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्दयांमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हरणार असून काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे,' असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यूज18 सोबत बोलताना केला आहे.

सोनिया गांधी सक्रिय

दरम्यान, लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालांनी वेग आला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतक नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

First published: May 17, 2019, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading