नवी दिल्ली 05 मे : लोकसभेच्या निवडणुकीचे चार टप्पे झाल्यानंतर काँग्रेसने पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्यावर कठोर कारवाई केली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी प्रवक्ते शकील अहमद यांची पक्षाने सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलीय. तिकीट मिळालं नसल्याने अहमद यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती.
बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने आघाडी केली आहे. त्यामुळे जागावाटपात काँग्रेसला फटका बसलाय. काही जागा राजदला गेल्याने अनेक नेते नाराज झालेत. शकील अहमद यांना मधूबनी मतदार संघातून तिकीट हवं होतं. मात्र ते मिळालं नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
बिहार प्रदेश काँग्रेस समितीने त्याचा अहवाल दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे पाठविल्याने काँग्रेस कार्यसमितीने ही कारवाई केली. काँग्रेसमधले दिग्गज मुस्लिम नेते अशी शकील अहमद यांची ओळख आहे. हकालपट्टी करतानाच त्यांचं पक्षाचं सदस्यत्वही संपविण्यात आलं आहे.
शकील अहमद यांच्यावरच्या कारवाईने राहुल गांधी यांनी बंडखोरांना कडक संदेश दिल्याचं बोललं जातंय. कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही असं राहुल गांधी यांनी ठरवलं असल्याची माहिती काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिली आहे.
नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धाडसी पाऊल समजला जाणारा नोटबंदीचा निर्णय हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. मोदींच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था अतिशय वाईट स्थितीत पोहोचली असल्याची टीकाही त्यांनी केली. देशाला एका नव्या दमाच्या नेत्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीचा अतिशय धाडसी पाऊल असा उल्लेख करतात. या निर्णयामुळे काळ्यापैशाला आळा बसला असा दावाही त्यांच्याकडून करण्यात येतो. मात्र विख्यात अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय त्या धक्क्यातून अर्थव्यवस्था अजुनही सावरेली नाही.
देशाची जनता परिवर्तनाच्या तयारीत आहे. लोकांना बदल हवा आहे. सबका साथ सबका विकास हा या सरकारचा मंत्र नाही तर लोकांच्या मनात व्देष निर्माण करणं हेच सरकारचं काम आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. या आधी राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर नोटबंदीवरून जोरदार टीका केली होती.