नवी दिल्ली 05 मे : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा सोमवारी पार पडतोय. निवडणुकीच्या या प्रचारात मुलभूत मुद्दे सोडून अनेक भावनिक मुद्यांचा समावेश होतोय. आता टिपू सुलतान यांचा प्रचारात समावेश झालाय. टिपू सुलतानवरून भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याl जोरदार खडाजंगी झालीय.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 4 मे रोजी टिपू सुलतान यांच्या पुण्यतिथीला एक ट्विट करत टिपू सुलतान मला आवडतो असं म्हटलं होतं. त्यांनी जो संघर्ष केला तो मला प्रेरणादाई वाटतो असंही ते म्हणाले. भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर यांनी इम्रान खान यांचं ते ट्विट रिट्विट करत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटा
चंद्रशेखर सिद्धरामय्यांना म्हणाले, आता सिद्धूसारखं तुम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आणि लष्करप्रमुखांना भेटा म्हणजे तुम्हीही काँग्रेसचे अध्यक्ष आणि सरसिटणीसांच्या जवळ जाल. त्यावर सिद्धरामय्यांनीही चंद्रशेखर यांच्यावर पलटवार केला. मी शत्रूराष्ट्राच्या पंतप्रधानांच्या घरी जाऊन बिर्याणी खात नाही असा टोला त्यांनी चंद्रशेखर यांना लगावला.
सिद्धरामय्या मुख्यमंत्री असतानाच त्यांनी कर्नाटकमध्ये टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याची घोषणा केली होती. तर भाजपने त्याला विरोध केला होता. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला अचानक भेट देत नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नाला हजेरी लावली होती.
रमजानच्या काळात मतदान लवकर नाही
रमजानच्या काळात मतदान प्रक्रिया पहाटे 5 वाजता सुरू करणं शक्य नाही असं निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केलं. या काळात मतदान पहाटे 5 वाजता शक्य आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केली होती. मात्र असं करणं हे सध्या शक्य नाही. त्यासाठी खूप मोठी तयारी करावी लागते असं आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे आता यापुढे सर्व टप्पे नियोजित वेळेप्रमाणेच होणार आहेत.
सर्वोच्च न्यायलयामध्ये याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगला ही विचारणा केली आहे. याबाबत न्यायालयानं निवडणूक आयोगाकडे केवळ विचारणा केली होती. त्याबाबत उत्तर मागितलं नाही. दरम्यान, याबाबतचा सर्व निर्णय हा निवडणूक आयोगाच्या हातात आहे.