चंदिगड 17 मे : पंजाबमधल्या गुरुदासपूर मतदार संघातले भाजपचे उमेदवार सनी देओल यांना निवडणुकीत गैरप्रकार होण्याची भीती वाटतेय. त्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. देओल यांच्या याचिकेची दखल घेत पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला काही निर्देशही दिले आहेत.
गुरुदासपूरचे भाजपचे उमेदवार असलेले अभिनेते सनी देओल यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड हे उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे मतदानाच्या दिवशी गैरप्रकार होण्याची भीती त्यांना वाटतेय. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेत आणखी उपाययोजना करण्याचे निर्देश आयोगाला देण्याची विनंती केली.
त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाला निर्देश देत निमलष्करी दलाच्या 15 ऐवजी 24 कंपन्या तैनात करण्याचे निर्देश दिलेत. या आदेशाची दखल घेत आयोगाने अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र
लोकशाही सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला. 19 मेला शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान आहे. त्यासाठीची सर्व तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी पोहोचत आहे. जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र हिमाचल प्रदेशात असून मतदान सामुग्री घेऊन निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथक तिथे पोहोचलही आहे.
हिमाचल प्रदेशात अजुनही अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. काही ठिकाणी अजुनही हिमवर्षाव सुरू आहे. मंडी मतदारसंघात लाहूली तालुक्यातलं तशीगंग हे मतदान केंद्र जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र ठरलं आहे. समुद्र सपाटीपासून त्याची उंची 15 हजार 256 फूट आहे. मतदान कर्मचाऱ्यांचं पथक सर्व सामुग्री घेऊन या ठिकाणी पोहोचलही आहे.
तिथल्या वातावरणाशी जुळवून घेता यावं यासाठी एक दिवस आधीच हे पथक त्या केंद्रावर पोहोचलं आहे. कडाक्याची थंडी आणि श्वास घ्यायला अडचण येण्याची शक्यता गृहित धरून डॉक्टरांचं पथकही सज्जा ठेवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.