News18 Lokmat

हिमाचल प्रदेशातलं हे आहे जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र

समुद्र सपाटीपासून 15 हजार 256 फूटावर हे मतदान केंद्र असून तिथे कडाक्याची थंडी आहे.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 09:12 PM IST

हिमाचल प्रदेशातलं हे आहे जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र

सिमला 17 मे : लोकशाही सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला. 19 मेला शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान आहे. त्यासाठीची सर्व तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी पोहोचत आहे. जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र हिमाचल प्रदेशात असून मतदान सामुग्री घेऊन निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथक तिथे पोहोचलही आहे.

हिमाचल प्रदेशात अजुनही अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. काही ठिकाणी अजुनही हिमवर्षाव सुरू आहे. मंडी मतदारसंघात लाहूली तालुक्यातलं तशीगंग हे मतदान केंद्र जगातलं सर्वात उंचावरचं मतदान केंद्र ठरलं आहे. समुद्र सपाटीपासून हे मतदान केंद्र 15 हजार 256  फूटांवर आहे. मतदान कर्मचाऱ्यांचं पथक सर्व सामुग्री घेऊन या ठिकाणी पोहोचलही आहे.

तिथल्या वातावरणाशी जुळवून घेता यावं यासाठी एक दिवस आधीच हे पथक त्या केंद्रावर पोहोचलं आहे. कडाक्याची थंडी आणि श्वास घ्यायला अडचण येण्याची शक्यता गृहित धरून डॉक्टरांचं पथकही सज्जा ठेवण्यात आलं आहे.



Loading...

निवडणुकीचा कटु प्रचार संपला

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकांचा प्रचार शुक्रवारी 17 मे रोजी अखेर संपला. या निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. यातल्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान 19 मेला होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी असून नवं सरकार कुणाचं असेल ते स्पष्ट होणार आहे. आरोप-प्रत्यारोप, शिव्यांचा मनसोक्त वापराने हा प्रचार चांगलाच गाजला. त्यामुळे प्रचाराची पातळी खालावल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे. आता प्रचाराचा धुराळा थंडावला असून 23 मे नंतरची व्युव्हरचना आखण्यात सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केलं आहे.

11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. तर 19 मे ला शेवटच्या सातव्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं. बंगालमध्ये मात्र भाजप आणि तृणमूलच्या भांडणात निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लागलं. आयोगाने ऐतिहासिक निर्णय घेत प्रचार एक दिवसांनी कमी केला.

या प्रचारात वाचाळवीरांनी आपल्या वक्तव्यांनी प्रचाराची पातळी खाली आणली. साध्वी प्रज्ञासिंग, योगी आदित्यनाथ, आझम खान, नवज्योतसिंग सिद्धू, मणिशंकर अय्यार, सॅम पित्रोदा, मायावती, यांच्या वक्तव्यांनी वाद निर्माण झालेत. यातल्या अनेक नेत्यांवर निवडणूक आयोगाने प्रचाराची बंदीही घातली होती. पंतप्रधान मोदींनी आपल्या झंझावती दौऱ्यात 142 प्रचारसभा तर 4 रोड शो केले अशी माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिली.

बालाकोटच्या हल्ल्यानंतर प्रचाराची दिशा बदलल्याचं मत व्यक्त केलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारात राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित केला. देश सुरक्षीत नेत्याच्या हातात सोपवा असं आवाहन त्यांनी केलं. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलचा मुद्दा उपस्थित करून मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी, लोकशाहीवरचं आक्रमण अशा अनेक मुद्यांवरून त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2019 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...