नवी दिल्ली 24 मे : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या कामगिरीचं मुल्यमापन आता सुरू झालंय. ऐन निवडणुकीच्या काळात हुकूमी एक्का म्हणून ज्या प्रियंका गांधी यांच्याकडे पाहिलं जात होतं त्याच या निवडणूकीत फेल ठरल्याचं स्पष्ट झालंय. उत्तर प्रदेश आणि देशात ज्या ठिकाणी प्रियंका गांधींनी प्रचार केला त्या सर्व जागांवर काँग्रेसला पराभव पत्करावा लगाला.
लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसने प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणाच्या प्रवेशाची घोषणा केली होती. त्यांना पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या भागात त्यांच्या मतपेढीला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसने ही चाल खेळली असं बोललं जाऊ लागलं.
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी लगेच कामाला सुरुवातही केली. मात्र खिळखिळी झालेल्या काँग्रेसला त्या सावरू शकल्या नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तर प्रदेशात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी विस्कटून गेली होती. राज्यात सक्षम नेतृत्व आणि नेते राहिलेले नाहीत, जनाधार आटत गेलाय अशा परिस्थितीत प्रियंका गांधी पक्षाला नवसंजीवनी देतील असं वाटत होतं मात्र तसं काहीही झालं नाही.
उत्तर प्रदेशासोबतच प्रियंका गांधी यांनी पंजाब, हरियाणा, आसाम आणि दिल्लीत प्रचार केला. उत्तर प्रदेशात त्यांनी 12 जागांवर प्रचार केला. त्यातल्या 11 जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. फक्त रायबरेलीची जागा त्यांना वाचवता आली. आसाममधल्या सिलचर, हरियाणातल्या अंबाला, हिस्सार आणि रोहतकमध्ये त्यांनी प्रचार केला. या सर्व जागांवर काँग्रेसचा पराभव झाला.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अमेठीत खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झाला. काँग्रेसने उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 67 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला फक्त रायबरेलीची एक जागा जिंकता आली. तिथेही सोनिया गांधी उभ्या असल्याने आणि सपा-बसपाने ती जागा सोडल्याने काँग्रेसला किमान खातं उघडता आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Priyanka gandhi, Rahul gandhi, Uttar pradesh, काँग्रेस