• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • CAA विरोधात दिल्ली-अलीगढमध्ये वातावरण पेटलं, पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर

CAA विरोधात दिल्ली-अलीगढमध्ये वातावरण पेटलं, पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर

CAAच्या मुद्द्यावरून दिल्ली आणि अलीगढमधील वातावरण पुन्हा एकदा चिघळलं आहे. दिल्ली आणि अलीगढमध्ये CAA विरोधात प्रदर्शन सुरू आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : CAAच्या मुद्द्यावरून दिल्ली आणि अलीगढमधील वातावरण पुन्हा एकदा चिघळलं आहे. दिल्ली आणि अलीगढमध्ये CAA विरोधात प्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे काही भागामध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे तर काही ठिकाणी अश्रुधुराचा वापर करावा लागला आहे. दिल्लीतील जाफराबादजवळ मौजपूरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. मौजपूरजवळ भाजपा नेता कपिल मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांकडून CAA सीएएच्या समर्थनार्थ हनुमान चालीसा पठण सुरू होतं. दरम्यान CAA समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर दगडफेकीत झालं. याआधी शनिवारीपासून जाफराबादमध्ये तणावाचं वातावरण आहे. जाफराबाद मेट्रो स्टेशनजवळ महिलांनी CAA विरोधात जोरदार प्रदर्शनं केली होती. आज दुपारी चांदबागमध्ये देखील याच पार्श्वभूमीवर प्रदर्शनं करण्यात आली होती. (हेही वाचा-आरोपी विनय शर्माचा पुन्हा धक्कादायक प्रकार, स्टेपल पिन गिळण्याचा प्रयत्न) जाफराबादमध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनातील महिलांचा नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला पूर्णपणे विरोध आहे. सामाजिक कार्यकर्ते फहीम बेग म्हणतात की, ‘सरकार या मुद्द्याकडे बेपर्वाईने बघितलं जात आहे त्यामुळे लोकांमध्ये द्वेष वाढतो आहे.’जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत हे प्रदर्शन सुरू ठेवण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे. दरम्यान या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी सरिता विहार आणि जसोला भागात स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आलं. CAA समर्थक आणि विरोधकांच्या या आंदोलनांमुळे शाहीनबाग, चांदबाग आणि जाफराबाद मधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. महिलांच्या प्रदर्शनामुळे दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनकडून जाफराबाद स्टेशनवर मेट्रो न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो स्टेशनवर येण्या-जाण्यासाठी अटकाव करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सलीमपूरला यमुना विहार आणि मौजपूरसोबत जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिलांकडून तिरंगा हातात घेऊन ‘आझादी’च्या घोषणा देण्यात येत आहेत. (हेही वाचा-ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार!) दरम्यान या प्रदर्शनाविरोधात स्थानिक नागरिक एकवटले आहेत. शाहीनबाग, जाफराबाद मेट्रो स्टेशन आणि चांदबाग परिसरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे बंद असलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याची मागणी या नागरिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांच असं म्हणणं आहे की, ‘मेट्रो-रस्ते बंद ठेवल्यामुळे मुलांना शाळेत-कामावर जाता येत नाही आहे. आमच्या मुलभूत अधिकांराची त्यामुळे पायमल्ली होत आहे.’ तर दुसरीकडे अलीगढमध्ये वातावरण चिघळलं आहे. अलीगढमध्ये CAA ला विरोध करण्यासाठी आंदोलनं करण्यात येत आहेत. याठिकाणी जाळपोळ देखील झाल्यामुळे तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांच्या गाड्या देखील पेटवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आहे. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: