नवी दिल्ली, 9 डिसेंबर : आंध्र प्रदेशातील एलुरूमध्ये पसरलेल्या रहस्यमयी आजाराने सर्वांनाच हैराण केलं होतं. या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जवळपास 550 लोकांची या गूढ आजाराने तब्येत बिघडली होती. दिल्लीतील एम्स डॉक्टरांची टीम या आजाराच्या तपासासाठी काम करते आहे. आता एम्स डॉक्टरांच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. या आजाराने तब्येत बिघडलेल्या रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यात 10 रुग्णांच्या रक्तात शिसं आणि निकेल धातूचे कण आढळले.
दिल्लीतील एम्सच्या प्राथमिक रिपोर्टनुसार, एलुरूमध्ये शनिवारपासून आतापर्यंत कमीत-कमी 550 लोक रहस्यमयी आजाराने ग्रस्त आहेत. या रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आली की, रुग्णांच्या शरीरात पाणी किंवा दुधाच्या माध्यमातून शिसं आणि निकेल धातूचे कण पोहचले.
एलुरूतील सरकारी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. एवी मोहन यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, एम्समध्ये पाठवण्यात आलेल्या रुग्णांचे सॅम्पल साईज कमी होते, परंतु त्यांच्या आलेल्या रिपोर्टनुसार, त्या रुग्णांच्या रक्तात शिसं आणि निकेल धातूचे कण आढळले. आणखी रुग्णांचे सॅम्पल एम्समध्ये पाठवण्यात आले आहेत, अद्याप त्याचे रिझल्ट आलेले नाहीत.
डॉ. मोहन यांनी या रहस्यमयी आजाराने आतापर्यंत 550 लोकांची तब्येत बिघडली होती, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या 84 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.