नवी दिल्ली, 26 जानेवारी : भारताने 1950ला आजच्याच दिवशी राज्यघटना लागू केली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. देशात आज 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना इंटरनेटवर सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गुगलने यानिमित्त खास डूडल तयार केलं आहे.
गुगलने तयार डूडलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर चित्ररथांसह भारताची संस्कृती आणि वारसा यांचे चित्रण केले आहे. आकर्षक रंगात असलेल्या या डूडलमध्ये भारतातील वारसास्थळ, कृषी संस्कृती, प्राणी यांचा समावेश केला आहे.
राजपथावर दरवर्षी देशातील प्रत्येक राज्याच्या खास चित्ररथांचे संचलन केले जाते. या चित्ररथांमधून त्या-त्या राज्याची संस्कृती, वैशिष्ठ्य दाखवण्यात येतात. याचाच वापर करत गुगलने अनोखं डूडल साकारलं आहे.
गूगल इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रजासत्ताक दिनाचे डूडल पोस्ट करण्यात आले आहे. पहिलं प्रजासत्ताक दिनाचं संचलन राजपथावर 1955 ला झालं होतं. आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिनाची 70 वर्ष साजरी करत आहोत, अशा शब्दांत ट्विट केलं आहे.