Home /News /national /

मणिपूरमध्ये आर्मी कॅम्पला भुस्खलनाचा तडाखा; 30 ते 40 जवान अडकल्याची भीती, 7 जवानांचा मृत्यू

मणिपूरमध्ये आर्मी कॅम्पला भुस्खलनाचा तडाखा; 30 ते 40 जवान अडकल्याची भीती, 7 जवानांचा मृत्यू

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

    मुंबई, 30 जून : मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 टेरिटोरियल आर्मी छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात सापडली आहे. या अपघातानंतर डझनभर जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 13 जवानांना वाचवण्यात यश आले आहे. त्याच वेळी, 30-40 पेक्षा जास्त अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. दरड कोसळल्याने इझाई नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. ही नदी तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून वाहते. वृत्तानुसार, काही नागरिक देखील ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे बचाव मोहिमेत अडचणी येत आहेत. लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले आहे. आजूबाजूचा परिसर लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला जात आहे. ढिगाऱ्यांमुळे इजाई नदी पाण्याचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी पाणी साचल्याने धरण सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तो फुटला तर सखल भागात अधिक परिणाम होऊ शकतो. जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी 107 टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यानंतर गुरुवारी सकाळी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    पुढील बातम्या