पाटणा, 11 डिसेंबर : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांचे लहान चिरंजीव तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांनी नुकतंच एका ख्रिस्ती धर्मीय तरुणीसोबत लग्न केलंय. पण त्यांच्या या लग्नावरुन त्यांचे मामा साधू यादव (Sadhu Yadav) हे प्रचंड भडकले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) नाव न घेता तेजस्वी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला तेजस्वी यादव यांच्या बहीण रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. रोहिणी यांनी आपल्या मामांना थेट 'कंस मामा'ची उपमा दिली आहे. तसेच नातं टिकवायचं असेल तर कृष्णासारखं वागा, असा सल्ला रोहिणी यांनी आपल्या मामाला दिला आहे.
"कंस आजही समाजात वास्तव्यास आहे. यांनी ते सिद्ध करुन दाखवलं. नातं जपायचं असेल तर कृष्ण बना, दुष्ट कंसासारखं अन्याय करणारं बनू नका", अशा शब्दात रोहिणी आचार्य यांनी आपल्या मामावर निशाणा साधला आहे.
कंस आज भी समाज में मौजूद है इन्होंने साबित कर दिया. रिश्ता निभाना है तो कृष्ण बनो दुष्ट कंस के जैसा अन्यायी ना बनो.. https://t.co/v2qjP7csYm
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) December 11, 2021
तेजस्वी यादव यांनी 9 डिसेंबरला राशेल नावाच्या तरुणीसोबत विवाह केला. विशेष म्हणजे लग्नाआधी राशेलचं नाव बदलून राजेश्वरी यादव करण्यात आलं, अशी चर्चा आहे. पण या लग्नावर तेजस्वी यांचे मामा साधू यादव नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना तीव्र शब्दांमध्ये टीका केली. हे लग्न म्हणजे समाजाच्या माथ्यावर लावलेला कलंक आहे, असा घणाघात त्यांनी केला.
हेही वाचा : 'अखेर मी मुंबईला आलोय, सभा घेणारच', इम्तियाज जलील यांचं राज्य सरकारला आव्हान
साधू यादव यांनी काल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांच्या लग्नावरुन टीका केली होती. "तेजस्वी यादव यांनी खिस्ती मुलीसोबत लग्न करुन समाजाच्या माथ्यावर कलंक लावला आहे. आमचा यदुवंशी समाज या लग्नाचा स्वीकार करणार नाही. तेजस्वी यांनी आपल्या सर्व बहिणींचं लग्न यादव समाजात केलं. पण स्वत: ख्रिश्चन समाजाच्या तरुणीसोबत लग्न केलं. या गोष्टीला आमचा समाज परवानगी देत नाही", असं साधू यादव म्हणाले.
"यादव समाजाने निवडणुकीत आरजेडीला मतदान करावं, असं तेजस्वी यादव यांना वाटतं. पण त्याच यादव समाजातील मुलीसोबत लग्न न करता त्यांनी दुसऱ्या समाजाच्या मुलीसोबत लग्न केलं", असंदेखील ते यावेळी म्हणाले. "तेजस्वी यादव नेहमी जातीय जनगणना व्हावी, अशी मागणी करतात. पण त्यांनी आता खिश्चन मुलीसोबत लग्न केलंय. त्यामुळे जातीय जनगणनेची काय आवश्यकता आहे? तेजस्वी जर जात मानत नाहीत तर जातीय जनगणनाची मागणी का करत आहेत?", असा सवाल त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.