मराठी बातम्या /बातम्या /देश /भारतात जन्मलेल्या 2 चित्त्यांचा पिल्लांचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

भारतात जन्मलेल्या 2 चित्त्यांचा पिल्लांचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

कुनो नॅशनल पार्कमधल्या चित्त्यांच्या दोन पिल्लांचा मृत्यू

कुनो नॅशनल पार्कमधल्या चित्त्यांच्या दोन पिल्लांचा मृत्यू

भारतामध्ये चित्त्यांच्या वास्तवासाठीच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये गुरूवारी मादी चित्ता ज्वालाच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाला आहे.

भोपाळ, 25 मे : भारतामध्ये चित्त्यांच्या वास्तवासाठीच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये गुरूवारी मादी चित्ता ज्वालाच्या दोन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. याआधी मंगळवारीही एका पिल्लाने जीव गमावला होता. ज्वालाच्या चारपैकी तीन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. एक पिल्लू जिवंत असलं तरी त्याची प्रकृती गंभीर आहे. या पिल्लाला पालूपर चिकित्सालयात ठेवण्यात आलं आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये 6 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता ज्वालाने 27 मार्चला 4 पिल्लांना जन्म दिला होता, पण या पिल्लांना उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन झालं. प्रमुख वन संरक्षक जेएस चौहान यांनी पिल्लांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. पिल्लांच्या प्रकृतीकडे आम्ही लक्ष देत आहोत, पण दिवसाचं तापमान 46 ते 47 डिग्री सेल्सियसपर्यंत जात आहे, त्यामुळे या पिल्लांना त्रास होत आहे, असं वन संरक्षक म्हणाले.

सप्टेंबरमध्ये भारतात आणले चित्ते

भारतामध्ये चित्ते 70 वर्षांपूर्वी विलुप्त झाले, यानंत चित्ता प्रोजेक्ट अंतर्गत नामिबियामधून 8 चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन चित्ते जंगलामध्ये सोडले, यानंतर 18 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते कुनोमध्ये आणले गेले. चार पिल्लांच्या जन्मानंतर चित्त्यांची संख्या 24 झाली होती. पिलांच्या जन्माआधी मादी चित्ता साशाचा मृत्यू झाला, यानंतर काहीच दिवसांमध्ये उदय आणि दक्षा या दोन चित्त्यांनीही जीव गमावला. आता तीन पिल्ल्यांच्या मृत्यूनंतर चित्त्यांची संख्या 18 राहिली आहे.

नामिबियामधून आलेली मादी चित्ता ज्वालाने चार पिल्लांना जन्म दिला, ती पहिल्यांदाच आई बनली होती. ही पिल्लं आता जवळपास 8 आठवड्यांची झाली आहे. या वयामध्ये पिल्लं जिज्ञासू होतात, मागच्या 8-10 दिवसांमध्ये या पिल्लांनी आईसोबत फिरायला सुरूवात केली होती, तेव्हाच उकाड्यामुळे ते आजारी पडले होते.

First published:
top videos