कोंडागाव , 04 सप्टेंबर : विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणांवरून मारहाण करणाऱ्या मारकुट्या शिक्षकांचे कारनामे अनेकदा समोर आले आहेत. अशाच एका घटनेत कृष्ण जन्माष्टमीच्या (krishna janmashtami ) दिवशी उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने बेदम मारहाण (teacher brutally beaten) केल्याचा प्रकार समोर आला आहे. देवाविषयी श्रद्धा बाळगल्यावरून या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात पालकांसह इतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
देवाविषयी श्रद्धा बाळगणे अथवा न बाळगणे ही बाब संपूर्णपणे खासगी आहे. तसंच, ती श्रद्धा व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी असू शकते. मात्र, शिक्षकाने अशा कारणाने विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद देणे अत्यंत अयोग्य असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना मारहाण करून शारीरिक शिक्षा देणं कायदेबाह्यही आहे.
मुलांनी जन्माष्टमीला केला होता उपवास
कोंडागाव जिल्ह्यातील गिरोला गावात असलेल्या बुंदापारा माध्यमिक शाळेत घडलेली ही घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना 'कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कोणी कोणी उपवास केला' असे विचारले. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी हात वर केले, अशा सर्वांना या शिक्षकाने चांगला चोप दिला.
पालकांमध्ये संताप
मुलांनी त्यांच्या घरच्यांना शाळेत झालेल्या मारहाणीबद्दल सांगितले. त्यानंतर शाळेतील एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत मुले त्यांच्या पालकांसोबत उभी असल्याचं दिसत आहे. मुलांनी शिक्षकानं आपल्याला मारहाण करण्याचं कारणही सांगितल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मुलांनी सांगितलंय की, शिक्षकानं त्यांना विचारलं की, जन्माष्टमीचा उपवास कोणी कोणी केला. ज्यांनी हात वर केले, त्यांना वेगळे केले आणि नंतर सर्वांना जबर मारहाण केली.
हे वाचा - VIDEO: कोंबड्यासोबत पंगा घेणं भोवलं; तरुणाची झाली भलतीच फजिती, अक्षरशः फुटला घाम
बजरंग दल शाळेत
मुलांनी त्यांच्या पालकांना घटनेची माहिती देताच सर्व पालक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते शाळेत पोहोचले. त्यांनी तिथे गर्दी करत शिक्षकाला फैलावर घ्यायला सुरुवात केली. घटनास्थळी परिस्थिती बिघडू नये, म्हणून पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांना उपवास करणाऱ्या मुलांना मारहाण करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल केलाय.
हे वाचा - बहिणीच्या नवऱ्यावर जडलं तरुणीचं प्रेम पण…; अतिशय वेदनादायी झाला दाजी-मेहुणीच्या लव्ह स्टोरीचा शेवट
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश मिश्रा म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासानंतर अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.