• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • नक्की कोण आहेत जोधपूरमधल्या 'स्पाइस गर्ल्स'? वाचा आई आणि सात मुलींची प्रेरक यशोगाथा

नक्की कोण आहेत जोधपूरमधल्या 'स्पाइस गर्ल्स'? वाचा आई आणि सात मुलींची प्रेरक यशोगाथा

एम. व्ही. स्पायसेस (M. V. Spices) या आज नावारूपाला आलेल्या मसाले व्यवसायाची कथा प्रेरक आहे.

 • Share this:
  मसाल्याचे पदार्थ ही भारताची खासियत आहे. भारतातल्या मसाल्याच्या पदार्थांचं (Indian Spices) पाश्चात्यांना पूर्वीपासूनच फार कौतुक. अगदी वास्को द गामा भारतात आला होता, तेव्हाही तो जाताना जहाज भरून मसाल्याचे पदार्थ घेऊन गेला होता असं म्हणतात. मसाल्याचे पदार्थ आणि त्यांपासून तयार केले जाणारे मसाले ही भारताची वैभवशाली परंपरा (Rich Culture) आहे. हे मसाले वापरल्यानेच भारतातल्या पदार्थांना वैशिष्ट्यपूर्ण चव येते. मसाले बनवण्याचं हे ज्ञान परंपरेने पुढे चालवत आणण्यात, जपण्यात भारतीय स्त्रियांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच देशातल्या वेगवेगळ्या भागांत त्या त्या प्रदेशांतल्या वैशिष्ट्यपूर्ण मसाल्यांची चव चाखायला मिळते. राजस्थानातल्या (Rajasthan) जोधपूरमधल्या (Jodhpur) एम. व्ही. स्पायसेस (M. V. Spices) या आज नावारूपाला आलेल्या मसाले व्यवसायाची कथा प्रेरक आहे. एक महिला आणि तिच्या सात मुलींनी केलेल्या अथक परिश्रमांतून आजचं यश त्यांना प्राप्त झालं आहे. त्या मुलींना आज स्पाइस गर्ल्स (Spice Girls) अशी सार्थ उपाधी मिळाली आहे. 'युवर स्टोरी डॉट कॉम'ने त्यांची यशोगाथा प्रसिद्ध केली आहे. भगवंती मोहनलाल आणि उषा, पूनम, नीलम, निक्की, कविता, रितू आणि प्रिया या त्यांच्या सात मुली आज जोधपूरमध्ये एम. व्ही. स्पायसेसची चार दुकानं चालवतात. वेगवेगळ्या प्रकारचे कुटलेले आणि न कुटलेले मसाले (Grounded and Ungrounded Spices) आणि मसाल्याचे पदार्थ त्यांच्याकडे उपलब्ध असतात. वैशिष्ट्यपूर्ण मसाला चहा, चहाचे मसाले, आमटी/करीसाठीचे मसाले, ख्रिसमस गिफ्ट पॅक्स आदी वस्तूही त्यांच्याकडे उपलब्ध असतात. परदेशी पर्यटक त्यांच्या दुकानांना आवर्जून भेट देतातच; पण परदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशातूनही मसाले घेता यावेत म्हणून त्यांनी वेबसाइटही तयार केली आहे. त्याद्वारे त्यांना महिन्याला किमान 30 परदेशी ऑर्डर्स मिळतात. कुटुंबीयांव्यतिरिक्त 12 अन्य व्यक्तींनाही त्यांनी रोजगार दिला आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या नीलमच्या नेतृत्वाखाली हा व्यवसाय सुरू आहे. कितीही स्पर्धा असली, तरी मसालेनिर्मितीसाठी मशीनरी वापरणार नसल्याचं नीलम सांगते. कारण मशीनरी वापरत नसल्यानेच मसाल्यांना वैशिष्ट्यपूर्ण चव असल्याचं ती सांगते. हे वाचा -  कोरोना काळातही 'तिनं' जिद्दीनं व्यवसाय केला उभा; जिद्दीच्या जोरावर गाठलं शिखर पण भरभराटीचे हे दिवस येण्यासाठी या सात मुलींच्या आई-वडिलांना बरेच कष्ट घ्यावे लागले होते. अजमेरमध्ये (Ajmer) वाढलेल्या भगवंती 22 वर्षांच्या असताना जोधपूरमधल्या मोहनलाल (Bhagwanti Mohanlal) यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. तेव्हा त्यांना हुंडाही द्यावा लागला होता. वास्तविक त्यांना उच्च शिक्षण घेऊन नोकरी करायची होती; मात्र आर्थिक प्रश्न असल्याने त्यांचं शिक्षण थांबवून लग्न करून देण्यात आलं होतं. त्यांचे पती मोहनलाल चांगल्या स्वभावाचे होते; मात्र भगवंती यांनी सलग तीन मुलींना जन्म दिल्याने सासरच्या मंडळींचा त्रास सुरू झाला. शेवटी भगवंती आणि मोहनलाल मुलींसह एकत्र कुटुंबातून बाहेर पडले. मोहनलाल यांचं एक किराणा दुकान होतं. त्यांना भगवंती यांच्या हातचं जेवण खूप आवडायचं. त्या वापरत असलेल्या मसाल्यांबद्दल त्यांना कुतुहल होतं. त्यातूनच या दाम्पत्याने स्वतःच मसाले तयार करायचं ठरवलं. तयार केलेले मसाले विकण्यासाठी मोहनलाल मेहरानगड किल्ल्याबाहेर (Mehrangarh Fort) रस्त्यावर बसू लागले. इथेच एम. व्ही. स्पायसेस या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एके दिवशी त्यांना जोधपूरच्या महाराजांनी बोलावणं धाडलं. त्यामुळे त्यांना धडकीच भरली; पण मोहनलाल यांच्याकडून घेतलेल्या मसाल्यांची कीर्ती एका फ्रेंच पर्यटकाकडून महाराजांपर्यंत पोहोचली होती. त्याने महाराजांना पत्र लिहून याबद्दल सांगितलं होतं. महाराजांनी खूश होऊन मोहनलाल यांना मसालेविक्रीसाठी किल्ल्यातच भाड्याने जागा दिली. मोहनलाल यांचा व्यवसाय तिथे सुरू झाला. पर्यटकांशी संवाद साधता येण्यासाठी त्यांनी स्पॅनिश, फ्रेंच आदी भाषाही शिकायला सुरुवात केली. इंग्लंड करी ऑर्गनायझेशनकडूनही (England Curry Organization) मोहनलाल यांच्या मसाल्यांना सर्टिफिकेट मिळालं. सगळं सुरळीत सुरू असताना दुर्दैवाने अचानक मोहनलाल यांचा मृत्यू झाला. भगवंती यांच्यासाठी तो खूप दुःखाचा आणि कठीण क्षण होता. भगवंती यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांचं दुकान भाड्याने चालवण्यासाठी परत मागितलं; मात्र त्या ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतः व्यवसाय चालवणार असल्याचं त्यांना सांगितलं. त्यावर सासरच्यांनी टीका केली; मात्र त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी उद्योग तर चालवलाच; पण मुलींनाही शिकवून तयार केलं. सगळ्या मुलींचं नियमित शिक्षण तर झालं आहेच; पण परदेशी भाषांमध्येही त्या पारंगत आहेत. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करून, काळानुरूप आवश्यक ते बदल करून त्यांनी आपला व्यवसाय आणखी नावारूपाला आणला आहे.
  First published: