लालूप्रसाद यादव यांची तब्येत आणखी बिघडली, पुढील उपचारांसाठी रिम्समधून AIIMS मध्ये पाठवणार

लालूप्रसाद यादव यांची तब्येत आणखी बिघडली, पुढील उपचारांसाठी रिम्समधून AIIMS मध्ये पाठवणार

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील AIIMS मध्ये पाठवण्यात येणार आहे. रिम्स मेडिकल बोर्डाने बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

रांची, 23 जानेवारी: आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी दिल्लीतील AIIMS मध्ये पाठवण्यात येणार आहे. रिम्स मेडिकल बोर्डाने बैठकीत हा निर्णय घेतला आहे. रिम्सने याबाबत होटवार जेल प्रशासनाला देखील माहिती दिली आहे. तुरुंग अधिक्षकांनी याची पुष्टी केली आहे.

गुरुवारी संध्याकाळी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्या चेहऱ्याला देखील सूज आली होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रांचीच्या RIMS रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. शुक्रवारी त्यांची भेट घेतल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी त्यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. त्यांनी अशी माहिती दिली की लालूंच्या चेहऱ्यावर सूज आहे आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आमची अशी इच्छा आहे की उपचारासाठी त्यांना बाहेर आणलं जावं, असंही तेजस्वी यादव म्हणाले होते.

लालूप्रसाद यांच्या फुप्फुसांमध्ये पाणी जमा झाल्याची माहिती देत तेजस्वी यादव यांनी असे सांगितले की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. क्रिएटनीन देखील वाढले आहे. तेजस्वी यादव सध्या रांचीमध्ये आहेत. आज ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेऊन त्यांच्या वडिलांच्या तब्येतीबाबत माहिती देणार आहेत.

या दरम्यान राबडी देवी त्यांची मुलगी मीसा भारती यांच्या समवेत पुन्हा एकदा रिम्समध्ये पोहोचल्या आहेत. याआधी शुक्रवारी रात्री लालूप्रसाद यांची त्यांनी 6 तास भेट घेतली, त्यावेळी त्या खूप भावुक झाल्या होत्या. यावेळी त्यांच्याबरोबर मुलगी मीसा भारती, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव देखील उपस्थित होते.

लालूप्रसाद यादव यांच्या तब्येतीसाठी रिम्स प्रशासनाने एका मेडिकल बोर्डाचे गठन केले होते. यामध्ये वेगवेगळ्या विभागातील 8 डॉक्टर आहेत. मेडिकल बोर्डाने काही वेळापूर्वीच निर्णय घेतला आहे की अधिक चांगल्या उपचारांसाठी लालू यादव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात येईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 23, 2021, 3:30 PM IST

ताज्या बातम्या