नवी दिल्ली, 6 एप्रिल : माजी आयपीएस अधिकारी आणि पद्दुचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्या नातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बेदी यांची नात मेहर भरुचा हिने मला किरण बेदी यांची नात असल्याचे सांगायला लाज वाटते असं या व्हिडिओत म्हटलं आहे. मेहर म्हणते की, मला आई किंवा तुझ्यासोबत रहायचे नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किरण बेदी यांनी नात मेहर भरूचाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर मेहरने व्हिडिओच्या माध्यामातून म्हणणे मांडले आहे. या व्हिडिओत मेहरसोबत तिचे वडील रूझबेह एन भरुचासुद्धा दिसत आहेत. आपण वडीलांसोबत सुरक्षित असल्याचे सांगत आपल्याला आजीकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मेहरने केला आहे.
मेहरने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, मी मेहर भरूचा किरण बेदी यांची एकुलती नात आहे. माझ्या वडिलांचं नाव रूझबेह एन भरुचा आहे. आजी माझ्या वडिलांना किंवा त्यांच्या मित्रांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असतेस. माझे अपहरण झालेले नाही आणि मला कोणताही मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला जात नाही. तू लहान लहान गोष्टींचा कांगावा करतेस. मला वडिलांसोबत सुरक्षित वाटते मी त्यांच्यासोबत आनंदी आहे.
किरण बेदी यांची मुलगी आणि मेहरची आई सायना बेदी यांनाही मेहरने या व्हिडिओतून सांगितले आहे की, मला वडिलांसोबत रहायचे आहे. मला आणि वडिलांना तुझ्यासोबत रहायचे नाही. मला किरण बेदी यांची नात असल्याचे सांगायला लाज वाटते. माझी आई वडिलांना मारते असं आजीला सांगितलं तेव्हा आजीने ते नवरा बायकोमधलं भांडण आहे तू गप्प बस असं सांगितलं. असं असेल तर मग आता पोलिसांचा वापर का करतेस असा प्रश्न मेहरने आजीला विचारला आहे.
मेहरची आई सायना बेदी आणि वडील रूझबेह यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. वडिलांना आईकडून मारहाण होत असल्याचा आरोप मेहरने केला आहे. यामुळेच आपण आईचे घर सोडून वडिलांक़डे राहत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर किरण बेदींनी मेहरचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. यावर आपलं अपहरण झालं नसल्याचं सांगण्यासाठी मेहरनं व्हिडिओ शूट केला आहे.