इस्लामाबाद, 18 नोव्हेंबर : बलूचिस्तानच्या तुर्बत भागात पाकिस्तानी सैन्यानं मोस्ट वॉण्टेड दहशतवादी मुल्ला ओमर (Mullah Omar) आणि त्याच्या मुलाला ठार केले आहे. मुल्ला ओमर लष्कर-ए-तैयबा, लष्कर-ए-कुरूसन आणि जैश-उल-आदल यांचा उच्च-सहाय्यक होता. दहशतवादी मुल्ला ओमरने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे अपहरण केले होते आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराकडे सोपवले होते.
स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या जैश अल-आदलचा दहशतवादी मुल्ला ओमर याला बलुचिस्तानच्या तुर्बत येथे त्याच्या मुलासह पाकिस्तानी सैन्यानं ठार मारले. तो इराणमधील मोस्ट वॉन्टेड (पाकिस्तानसाठी काम करणारा) दहशतवादी होता. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सैन्याकडे सोपवल्यानंतर ओमर चर्चेत आला होता. मात्र पाकिस्तान सैन्याला मदत करणाऱ्या ओमरला त्यांनी का मारले, याबाबत माहिती मिळू शकली नाही आहे. दहशतवादी मुल्ला ओमर आणि त्याच्या मुलाचा मृतदेह बलुचिस्तानमधील तुर्बात येथील स्थानिक फ्रंटियर कॉर्पसमध्ये ठेवण्यात आला आहे.
#BREAKING: Kidnapper of Indian National Kulbhushan Jadhav and Jaish al-Adl terrorist Mullah Omar, killed by Pakistan Army in Turbat, Balochistan along with his son, as per local sources. He was most wanted in Iran (working for Pakistan) and had handed over Jadhav to Pak Army. pic.twitter.com/5i4CmtPGhJ
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) November 17, 2020
भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. 10 मे, 2017 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं जाधव यांच्या फाशीवर बंदी घातली. पाकिस्तानचा असा दावा आहे की जाधव यांना त्याच्या सुरक्षा दलाने 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान प्रांतातून अटक केली होती जिथं ते इराणमधून आले होते. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर जाधव यांचे व्यवसायिक हितसंबंध असलेल्या इराणमधून अपहरण करण्यात आले असल्याचे भारताचे म्हणणे आहे.