...अन् हत्तीने 'उतरवला' तरुणाच्या अंगातला 'बाहुबली' !

एका सीनमध्ये अभिनेता प्रभास हत्तीवर चढतो. बास.. हा सीन जिनू महाशयांना आठवला. आणि त्यांनी याचं अनुकरण करायचा प्रयत्न केला. पण...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 06:54 PM IST

...अन् हत्तीने 'उतरवला' तरुणाच्या अंगातला 'बाहुबली' !

15 नोव्हेंबर : चित्रपटांमध्ये बघून खऱ्या आयुष्यात भलतं साहस करायला जाऊ नये. पण काहींना तसं नाही वाटत. केरळमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. बाहुबली सारखं एका हत्तीच्या सोंडेवर चढू पाहणाऱ्याला 'बाहुबली'ला 10 फूट लांब फेकून दिलं.

केरळच्या इडुक्कीमध्ये एका तरुणाला हत्तीनं 10 फूट लांब फेकून दिलं. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झालाय. जिनू जॉन असं या व्यक्तीचं नाव असल्याचं कळतंय. 12 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता, जिनू आणि त्याचे मित्र रबरच्या मळ्यातून जात होते. तिथे त्यांना एक हत्ती दिसला. तो दूर होता, त्याचं या तरुणांकडे लक्षही नव्हतं. पण जिनूचं हत्तीकडे लक्ष गेलं.

त्यानं त्याला आधी केळ खायला घातलं. हत्तीनं खाललं. मग जिनूनं हत्तीचा मुका घेतला. तेव्हाही हत्ती शांत होता. पण आता जिनूची हिंमत वाढली होती. तो सोंडेवर चढता येतंय का त्याचा वेध घेत होता. त्याचे मित्र त्याला इशारा देत होते, "भलतं धाडस करू नकोस, तू दारू प्यायला आहेस..हत्तीला आव्हान देऊ नकोस." पण जिनू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं सोंडेवर चढण्याचा प्रयत्न केला. हत्तीनं बरोबर इंगा दाखवत जिनूला 10 फूट लांब भिरकावलं. जिनू बेशुद्धच पडला. सुदैवानं त्याला गंभीर इजा झाली नाही. जिनू वाचला.

आता असलं काहीतरी करावं, याची कल्पना या महाशयांच्या डोक्यात कुठून आली ? तर बाहुबली चित्रपट बघून. त्यात एका सीनमध्ये अभिनेता प्रभास हत्तीवर चढतो. बास.. हा सीन जिनू महाशयांना आठवला. आणि त्यांनी याचं अनुकरण करायचा प्रयत्न केला. पण प्राण्यांची विचार करायची पद्धत बहुधा त्याला माहीत नव्हती. जोपर्यंत प्रेमानं वागाल, तोपर्यंत सहसा प्राणी काही करत नाहीत. पण त्यांना आव्हान वाटेस असं काही कृत्य केलं तर स्वसंरक्षणार्थ ते हल्ला करतात. त्यात हा प्राणी हत्ती होता. जिनूचं सुदैव की त्याला फार काही झालं नाही.

चित्रपटात दाखवले जाणारे स्टंट्स हे तज्ज्ञांच्या देखरेखीत चित्रित होतात. उड्या मारणे, हत्तीवर चढणे असे शॉट्स तर अभिनेते जाड वायर अंगाला लावून करतात. तेही अॅक्शन डायरेक्टरच्या देखरेखीखाली. अनेकदा कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून स्टंट्सची तीव्रता वाढवली जाते..ते अधिक नाट्यमय केले जातात. त्यामुळे, प्रेक्षकांना नम्र विनंती की असलं धाडस कधीच करू नये. आपला जीव अनमोल आहे, आणि तो धोक्यात घालण्यात काहीच हशील नाही.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...