भाजपचा फोकस शबरीमला आणि तिरुवनंतपूरम; असे आहे केरळमधील लोकसभेचे समीकरण

भाजपचा फोकस शबरीमला आणि तिरुवनंतपूरम; असे आहे केरळमधील लोकसभेचे समीकरण

लोकसभेच्या 20 जागा असलेल्या केरळमध्ये यंदा भाजप देखील एक मोठा दावेदार आहे.

  • Share this:

तिरुवनंतपूरम, 09 मे: डाव्यांचा गड असलेल्या केरळमधील लोकसभेची निवडणूक यंदा अचानक चर्चेत आली. ही चर्चा होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाड या केरळमधील मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

ऑगस्ट 2018मध्ये आलेल्या महापूरामुळे केरळची अर्थव्यवस्था कोसळली. यात 500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 8 लाख लोक बेघर झाले होते. आर्थिक अहवालानुसार राज्यातील 3 हजार 500 कोटी रुपयांच्या शेतीचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या निवडणुकीत महापूर आणि तेव्हा झालेल्या नुकसानीची चर्चा नसल्यासारखी आहे. विशेष म्हणजे महापूराच्या माऱ्यातून अद्याप एकही जिल्हा उभा राहिलेला नाही. काही तज्ञांच्या मते पी.विजयन यांच्या नेतृत्वाखालील LDF सरकारने पूर काळात मदत आणि बचाव कार्य चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे मतदार नाराज नाहीत. त्याचा फायदा डाव्या पक्षांना होऊ शकतो. याउलट भाजप नेतृत्वाखालील एनडीएसाठी केरळमधील निवडणूक महत्त्वाची आहे कारण त्यांना राज्यातून आतापर्यंत एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. पण राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथे राष्ट्रीय स्तरावरील युपीएमध्ये घटकपक्ष असलेल्या डाव्या पक्षांनाच काँग्रेसने विरोधक केले आहे.

केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा असून त्यापैकी 2 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. राज्यात याआधी मे 2016मध्ये विधानसभेच्या 141 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि त्यात काँग्रेसचा पराभव करत डाव्या पक्षांनी बाजी मारली होती. राज्यात एकूण 2 कोटी 54 लाख 58 हजार 095 मतदार आहेत. यात 1 कोटी 23 लाख 45 हजार 027 पुरुष तर 1 कोटी 31 लाख 12 हजार 949 महिला तर 119 अन्य मतदार आहेत. राज्यात यंदा 76.82% टक्के मतदान झाले आहे. 2014च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 2014मध्ये 74.04% टक्के मतदान झाले होते.

LDF विरुद्ध UDF

केरळच्या राजकारणात दोन महत्त्वाच्या आघाड्या आहेत . त्यापैकी एक आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM)च्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF)आणि दुसरा म्हणजे काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट (UDF)होय. यातील LDFआघाडीत सीपीआय, जेडीएस, एनसीपी आणि अन्य छोटे पक्ष आहेत. तर UDFमध्ये काँग्रेससह इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), केरळ काँग्रेस-एम आणि अन्य छोटे पक्ष सहभागी आहेत.

असे झाले जागा वाटप

2014च्या लोकसभा निवडणुकीत UDFने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 8 जागा काँग्रेसने तर दोन जागा IUMLने जिंकल्या होत्या. 2009च्या निवडणुकीत देखील राज्यातील 20 पैकी सर्वाधिक जागा UDFने जिंकल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला 40 टक्के मते मिळाली होती आणि 13 जागांवर विजय मिळाला होता. 2004मध्ये LDFने 15 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. यंदा LDF सर्व म्हणजेच 20च्या 20 जागांवर लढली आहे. त्यापैकी CPM 16 तर CPI 4 जागांवर असे जागा वाटप झाले आहे. UDFमध्ये काँग्रेस 15, IUML 2 जागांवर तर केरळ काँग्रेस-एम, सोशलिस्ट जनता डेमोक्रेटिक पक्ष प्रत्येकी जागेवर लढत आहे. यंदाच्या भाजपने भारत धर्म जनसेना या पक्षासोबत युती केली असून ते 14 जागांवर लढत आहेत. राज्यात भाजप कार्यकर्ते आणि RSSचे संघटन याच आधारावर निवडणुकीचा प्रचार करण्यात आला होता.

भाजपची नजर या दोन जागांवर

लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपला आजपर्यंत कधीच यश मिळाले नाही. 2014च्या मोदी लाटेत देखील भाजपला राज्यातून एकही जागा जिंकला आली नव्हती. यंदा भाजपने राज्यातील तिरुवनंतपूरम आणि पत्तनमथिट्टा या दोन जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातील तिरुवनंतपूरम मतदारसंघावर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचा कब्जा आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. 2009मध्ये त्यांनी सीपीआयच्या उमेदवाराचा १ लाख मतांनी पराभव केला होता. तेव्हा भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर होता. 2014मध्ये थरुर यांचा निसटता म्हणजे 15 हजार मतांनी विजय झाला होता. तर भाजपचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर होता. 1998पासून या मतदारसंघात भाजपची मते वाढत आहेत. 1998मध्ये भाजपच्या वर्मा राजा यांना 12.39 टक्के मते मिळाली होती. त्यात1999मध्ये वाढ होत ती 20.93 टक्क्यांवर पोहोचली. 2004मध्ये त्यात पुन्हा वाढ होत ती 29.86 टक्क्यांवर गेली. पण 2009मध्ये त्यात घट होत मतांची टक्केवारी 11.4 टक्के झाली. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपला सर्वाधिक 32.32 टक्के मते पडली होती.

तिरुवनंतपुरमध्ये 70 टक्के हिंदू

2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात पहिला विजय मिळवला होता. तिरुवनंतपूरम लोकसभा मतदारसंघातील नेमोम विधानसभेत सीपीएमच्या उमेदवाराचा पराभव करुन भाजपने विजय साकारला होता. 2011च्या जनगणनेनुसार तिरुवनंतपुरमध्ये नायर समाजाचे वर्चस्व असून येथे 65 ते 70 टक्के हिंदू मतदार आहेत.

पत्तनमथिट्टामध्ये 50 टक्के हिंदू तर 40 टक्के ख्रिश्चन

भाजपने लक्ष केंद्रीत केलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे पत्तनमथिट्टा अर्थात शबरीमला होय. या मतदारसंघात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार प्रचार केला होता. या मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे ए.के.अँटोनी, सीपीएमचे वीना जॉर्ज आणि भाजपचे सुरेंद्रन यांच्यात लढत होत आहे. 2011च्या जनगणनेनुसार पत्तनमथिट्टामध्ये 50 टक्के हिंदू तर 40 टक्के ख्रिश्चन आहेत. यामुळे ख्रिश्चन मते अँटोनी आणि वीना जॉर्ज यांच्या वाट्याला जातील त्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. पण राज्यात जात आणि धर्मावर मतदान होत नाही असेही काहींचे म्हणणे आहे. पण गेल्या वर्षभरात शबरीमला मुद्दयाचा फायदा भाजपला होऊ शकतो.

'मनसे फॅक्टर'चा मावळमध्ये पार्थ पवारांना होईल का फायदा? पाहा हा SPECIAL REPORT

First published: May 9, 2019, 10:31 PM IST

ताज्या बातम्या