केरळातील इंटिरियर शॉपचं नाव 'कोरोना'; नावामुळे व्यवसायात मोठा फायदा

केरळातील इंटिरियर शॉपचं नाव 'कोरोना'; नावामुळे व्यवसायात मोठा फायदा

'कोरोना' या नावाच्या गृहसजावटीच्या वस्तूंच्या दुकानात दररोज मोठ्या संख्येने ग्राहक येत आहेत. कोरोना या नावाच्या आकर्षणामुळे ग्राहक येत असल्याचं या दुकानाच्या मालकाचं मत आहे.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 20 नोव्हेंबर : अख्खं जग उलथवून टाकणाऱ्या कोरोना महामारीच्या नावाला आणि त्यासंबंधीच्या गोष्टींनी आपण हळू-हळू सावरतो आहोत. गेल्यावर्षी याचवेळी आपल्याला हे नाव माहीतही नव्हतं. कोरोना विषाणूविरुद्धची लढाई सुरू असताना मार्च-एप्रिल महिन्यात जन्मलेल्या जुळ्यांची कोरोना आणि कोविड अशी नावं ठेवल्याच्या बातम्याही झळकल्या होत्या. पण या नाम माहात्म्याने एखाद्याचा व्यवसाय वाढला असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरंय केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातल्या कालाठीपड्डी या भागातील 'कोरोना' या नावाच्या गृहसजावटीच्या वस्तूंच्या दुकानात दररोज मोठ्या संख्येने ग्राहक येत आहेत. कोरोना या नावाच्या आकर्षणामुळे ग्राहक येत असल्याचं या दुकानाच्या मालकाचं मत आहे.

या दुकानात रोपं, भांडी, दिवे तसंच इंटिरियर डिझायनिंगसाठी आवश्यक साहित्य मिळतं. एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी दिली आहे. या ट्विटमध्ये दुकानाचे काही फोटोही शेअर केले असून, दुकानाबद्दल माहिती दिली आहे. या दुकानाचे मालक जॉर्ज म्हणाले,‘मी 7 वर्षांपूर्वी दुकानांचं नाव कोरोना ठेवलं आहे. कोरोना हा शब्द लॅटिन असून त्याचा अर्थ क्राउन म्हणजे राजमुकुट असा होतो. दुकान इंटिरियर डेकोरेशनचं असल्याने हेच नाव योग्य ठरेल असं मला तेव्हा वाटलं. केवळ माझ्या दुकानांचं नाव कोरोना असल्याने अनेक जण दुकानात खरेदीला येत आहेत आणि या महामारीच्या काळात माझा व्यवसाय वाढला आहे.’

फोटोंमध्ये वेगेवगळी रोपं, दिवे यांचा दुकानात ठेवलेला संग्रह दिसतो आहे.

कोरोना महामारीशी संबंधित ही एकमेव घटना नाही. आणखी एक घटना ब्रिटनमध्ये घडली होती, ज्याबद्दल बातमीही प्रसिद्ध झाली होती. लंडन मिररच्या वृत्तानुसार स्टोक-न-ट्रेंटमध्ये राहणाऱ्या जिमी कोरोना याला जागोजागी त्याचं ओळखपत्र दाखवावं लागतंय कारण त्याचं नाव कोरोना आहे यावर लोक विश्वासच ठेवत नाहीत. एका मुलाचा बाप असलेल्या जिमीला अजून आपला जन्मदाखला दाखवावा लागतोय. एका हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना वाटलं की जिमी त्यांची चेष्टाच करतोय पण पुरावा पाहिल्यावर त्यांनी मान्य केलं. माझं नाव म्हणजे चेष्टेचा विषय झाला आहे असं जिमीनी म्हटल्याचं त्या वृत्तात म्हटलं होतं.

Published by: Karishma Bhurke
First published: November 20, 2020, 11:22 AM IST

ताज्या बातम्या