नवी दिल्ली, 30 जून: केरळमध्ये कोरोना संक्रमणाचा (Coronavirus) दर कमी होण्याचं नाव नाही. देशात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या काहीशी कमी होत असताना, दुसरीकडे केरळमध्ये (Kerala) रोज पाच आकडी नवी रुग्ण संख्या समोर येत आहे. देशात कोरोनाचे 5.52 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यापैकी एकट्या केरळमध्ये 1 लाख रुग्णसंख्या आहे. याचदरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन (Kerala Chief Minister Pinarayi Vijayan) यांनी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा (Corona Patient) मृतदेह घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की कोरोना काळात कोरोना रुग्णाचे कुटुंबिय, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकत नव्हते. आता ते कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या व्यक्तीला अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी, अंतिम संस्कार करण्यासाठी घरी घेऊन जाऊ शकतील असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये दररोज सरासरी टेस्ट पॉझिटिव्ही रेट (TPR) 10 टक्क्यांच्यावर आहे. आम्ही अतिशय कमी वेळात टेस्ट पॉझिटिव्ही रेट 29.75 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत आणण्यात सफल झालो आहे. परंतु यात अजूनही कमी येण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस वेरिएंटची तीन प्रकरणं समोर आल्याची माहिती आहे. चाचण्यांदरम्यान तीन नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस वेरिएंट आढळला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट वेगाने पसरली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग रुग्णांमध्ये कमी येण्यास काही काळ लागला. त्यामुळे राज्यातील निर्बंध अधिक शिथिल करण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, केरळमध्ये मागील 24 तासांत 13,550 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 104 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 10,283 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 99,174 जणांवर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये संक्रमण दर 11 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Covid-19, Dead body, Kerala