Home /News /national /

पाहा VIDEO : 2 मुख्यमंत्री बर्फात अडकले; मंदिर बंद होण्यापूर्वी केदारनाथला जोरदार हिमवृष्टी

पाहा VIDEO : 2 मुख्यमंत्री बर्फात अडकले; मंदिर बंद होण्यापूर्वी केदारनाथला जोरदार हिमवृष्टी

केदारनाथाची कवाडं प्रथेप्रमाणे पुढच्या सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहेत. या वर्षी दारं बंद व्हायच्या दिवशीच जोरदार बर्फवृष्टी झाली. पाहा VIDEO

    केदारनाथ (उत्तराखंड), 16 नोव्हेंबर : हिमालयातल्या चार धाम तीर्थांपैकी एक असलेलं केदारनाथ मंदिर हिवाळ्यात भाविकांसाठी बंद होतं. साधारण दिवाळीच्या सुमारास पूर्वनियोजित तारखेनुसार मंदिरात महापूजा होते आणि मंदिराची कवाडं बंद होतात. या वेळी केदारनाथ परिसरात दमदार बर्फवृष्टी आधीपासूनच सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी केदारनाथाची दारं बंद होणार होती. त्यापूर्वी तिथे दर्शनासाठी पोहोचलेल्या दोन मुख्यमंत्र्यांना या हिमवृष्टीतच अडकावं लागलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ Yogi Adityanath आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री (Trivendra Singh Rawat) केदारनाथ मंदिर बंद होण्यापूर्वीच्या पूजेसाठी आणि दर्शनासाठी पहाटेच केदारनाथ इथे पोहोचले होते. पण ते मंदिरात जात असतानाच हिमवृष्टीला सुरुवात झाली. सकाळी 8.30 वाजण्यापूर्वी दोन्ही मुख्यमंत्री आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी तिथून रवाना होणार होते. पण बर्फ पडत असल्याने केदारनाथचं वातावरण बिघडलं आणि हेलिकॉप्टर उड्डाण रद्द करावं लागलं. आता दोन्ही मुख्यमंत्र्यांसह अनेक पर्यटक आणि भाविक सकाळपासून केदारनाथमध्येच अडकून पडले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सकाळचा त्यांचा एक VIDEO ट्वीट केला आहे. सकाळपासून केदारनाथ परिसरात 3 फुटांहून अधिक बर्फ पडल्याचं वृत्त आहे. हिवाळ्यात या परिसरात होणाऱ्या हिमवृष्टीमुळेच हे तीर्थक्षेत्र पर्यटकांसाठी बंद केलं जातं. इथे येणारे रस्तेही बर्फामुळे बंद असतात. केदानाथ पाठोपाठ गंगोत्री, यमनोत्री आणि बद्रिनाथ हे इतर धामही हिवाळ्यात सहा महिने बंद असतात. पुढे ग्रीष्मात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या मंदिरांचे दरवाजे पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले होतील. भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिर हिवाळ्यासाठी बंद करण्यात येणार होतं. दरवर्षीप्रमाणे इथे त्यापूर्वी विधिवत पूजा झाली. आता सहा महिन्यांनंतर वातावरण पाहून पुन्हा एकदा केदारनाथाची कवाडं उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल. फक्त 6 महिन्यात लाखो भाविक या चार धाम यात्रेसाठी येतात. बिहारमधल्या यशानंतर योगींनी केदारनाथाचं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. मंदिर हिवाळ्यासाठी बंद होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तिथे पोहोचले. पहाटे 3 वाजल्यापासूनच मंदिर बंद होण्यापूर्वीची पूजा-अर्चा सुरू होती. त्यानंतर आदित्यनाथ बद्रिनाथ इथे एका कार्यक्रमासाठी पोहोचणं अपेक्षित होतं. पण हेलिकॉप्टर उड्डाणासाठी योग्य वातावरण नसल्याने त्यांना केदारनाथहून वेळेत निघता आलं नाही. बद्रिनाथ इथे उत्तर प्रदेश सरकारतर्फे 40 खोल्यांचं पर्यटक निवास बांधण्यात येत आहे. त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या